नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांची मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांची मुलांमध्ये उपउपांत्य फेरीत धडक   

पुणे: नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांने मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांनी मुलांमध्ये १ल्या आदित्य चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत धडक दिली. महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने शिवशक्ती महिला संघाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मॅट वर झालेल्या पहिल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात नाशिक शहरने पूर्वार्धातील १८-२४ अशा ६ गुणांच्या पिछाडीवरून मुंबई उपनगर पूर्वचा कडवा प्रतिकार ४३-३८ असा मोडून काढला. 
 
पूर्वार्धात चाचपडत खेळणार्‍या नाशिककराना उत्तरार्धात सूर सापडला. विदिशा सोनार, रिया खाडे यांनी शेवटच्या ५मिनिटात उपनगर वर लोण देत आघाडी घेतली. ती त्यांनी टिकवली. उपनगर कडून सेरेना म्हसकर, आस्था सिंग यांचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात थोडा कमी पडला. शेवटच्या काही मिनिटात लोण पडल्याने उपनगरला त्यातून सावरायला वेळ मिळाला नाही.नाशिकच्या मुलींची आगेकूच सुरू असताना मुलांना मात्र आपला गाशा गुंडाळावा लागला. उस्मानाबादने नाशिक शहरचा प्रतिकार ४६-३३ असा मोडून काढला. उस्मानाबादच्या विश्वजित सुपेकर, स्वराज मुळे, सुजय कुटे यांनी चतुरस्त्र खेळ करीत सामन्यावर आपले वर्चस्व राखले. ते शेवट पर्यंत कायम राखले. विश्रांतीला २२-१५ अशी त्यांच्याकडे आघाडी होती. नाशिकच्या सिद्धांत कनक, कार्तिक कोळसे यांनी बर्‍यापैकी लढत दिली. 
 
मुलींच्या दुसर्‍या सामन्यात पुणे ग्रामीणने सातार्‍याला ४०-१५ असे सहज नमविले. पहिला लोण देत पुणे ग्रामीणने मध्यांतराला १८-०६ अशी भक्कम आघाडी घेतली. मध्यांतरा नंतर आपला खेळ अधिक गतिमान करीत २ लोण देत सामना एकतर्फी केला. सानिका वाकसे, वर्षा बनसोडे यांच्या धारदार चढाया त्यांना आदिती भोसलेची मिळालेली पकडीची साथ या मुळे उस्मानाबादला हा विजय सोपा गेला. सातारची ईश्वरी किंजले चमकली. एकीकडे पुणे ग्रामीणच्या मुली उपांत्यपूर्व फेरी दाखल होत असताना मुलांच्या संघाला मात्र पराभवाला सामोरी जावे लागले. परभणीने पुणे ग्रामीणला ५०-२५ असे सहज नमविले. दोन्ही डावात २-२ लोण देत परभणीने गुणांचे अर्धशतक गाठले. पहिल्या डावात २८-११ अशी परभणीकडे आघाडी होती. किशोर जगताप, यश चव्हाण, नारायण शिंदे यांच्या चढाई पकडीच्या सर्वांगसुंदर खेळाला परभणीच्या विजयाचे श्रेय जाते. आदित्य भोसले, वैभव मुळे पुण्याकडून बरे खेळले. 
 
मुलींच्या सामन्यात जालना संघाने नंदुरबार संघावर ४२-२१ मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला जालना संघाकडे २२-१०अशी आघाडी होती. जालन्याच्या मोनिका पवार व वैष्णी शिवतरे यांनी सुरेख चढाया केल्या. राणी भुजंग हिने पकडी केल्या. नंदुरबारच्या समिक्षा पाटील निकिता यादव यांनी चांगल्या चढाया केल्या तर ज्योर्तीमयी शिंदे हिने पकडी केल्या. परभणी संघाने कोल्हापूर संगावर ४३-३६ असा विजय मिळविला. मध्यंतराला परभणी कडे २८-११ अशी आघाडी होती. परभणीच्या सोनाली नावकीकर, रागिनी दाहे यांनी जोरदार चढाया केल्या तर प्रतिक्षा बाबर हिने पकडी केल्या. कोल्हापूरच्या प्रतिक्षा गुरव व सायली कस्तुरे यांनी सुरेख चढाया केल्या. श्रुतिका खोत हिने पकडी केल्या.

Related Articles