हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी   

शिमला : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात सोमवारी रात्री ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर १२ जण बेपत्ता आहेत.सोमवारी सायंकाळपासून मंडीमध्ये २१६.८ मिमी इतका पाऊस झाला, असे उपायुक्त अपूर्व देवगण यांनी सांगितले. करसोगमध्ये पावसाने एकाचा बळी घेतला. तर, मंडीतील स्यांजमध्ये दोन कुटुंबातील सात जण बेपत्ता आहेत.
 
ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.करसोगच्या पुराण बाजार (पंजरत), कुट्टी, बराल, मामेल आणि भ्याल गावांमध्ये रस्ते आणि वाहने वाहून गेली. तसेच, करसोग, सराज आणि धर्मपूर उपविभागातील जवजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे.  पावसामुळे एक डझनहून अधिक घरे, गोठे, घोडे, गायी आणि शेळ्या वाहून गेल्याचे वृत्त आहे. पांडोहजवळील पाटीकारी वीज प्रकल्पातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.
 
हमीरपूर जिल्ह्यातूनही कच्च्या  घरांचे, पाणीपुरवठा आणि वीज योजनांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मंडी आणि हमीरपूरच्या जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांसाठी शाळा बंद ठेवल्या आहेत. हवामान विभागाने पुढील २४ तासांत चंबा, हमीरपूर, मंडी, शिमला, सिरमौर आणि सोलन या सहा जिल्ह्यांच्या काही भागांत कमी ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.
 

Related Articles