नोकर्‍यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग   

वृत्तवेध 

नोकर्‍यांशी संबंधित एका सर्वेक्षणात दावा करण्यात आला आहे की, भारतातील नोकरी बाजारपेठेत लगबग दिसून येत आहे. याचा अर्थ असा की मोठ्या संख्येने व्यावसायिक नवीन भूमिका शोधत आहेत. ते आता त्यांच्या सध्याच्या संस्थांमध्ये चांगल्या पगारासाठी वाटाघाटी करत आहेत.
 
मायकेल पेजच्या नवीनतम टॅलेंट ट्रेंड्स इंडियाच्या अहवालात दिसून आले आहे की या वर्षी ६२ टक्के व्यावसायिकांनी पगारवाढीसाठी वाटाघाटी केल्या आणि ३७ टक्के यशस्वी झाले. हे अंतर्गत प्रगती आणि बदलाचे लक्षण आहे. अहवालानुसार, यशस्वी पगारवाढीचा दर गेल्या वर्षी ३२ टक्क्यांवरून या वर्षी ३७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. हा अहवाल देशभरातील सुमारे तीन हजार व्यावसायिकांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. 
 
अहवालानुसार, व्यावसायिक त्यांच्या कंपन्यांमध्ये उद्देश, नीतिमत्ता आणि लवचिकता यांना प्राधान्य देत आहेत. ‘मायकेल पेज इंडिया अँड सिंगापूर’चे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक नीलय खंडेलवाल म्हणाले, ‘आजचे कर्मचारी वर्ग मूल्यकेंद्रित आणि भविष्यकेंद्रित होत चालले आहेत. निष्ठा सुनिश्चित करण्यासाठी केवळ नोकरीतील समाधान पुरेसे नाही. कंपनीमध्ये चांगली परिस्थिती असूनही नोकरी शोधणार्‍यांचे उच्च प्रमाण सूचित करते की लोक आता निष्क्रियतेकडून सक्रिय करिअर व्यवस्थापनाकडे जात आहेत. अहवालात दिसून आले आहे की भारतीय संस्थांमध्ये ‘जनरेशन एआय’ साधनांचा अवलंब करण्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ६४ टक्के व्यावसायिक ‘चॅटजीपीटी’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट को पायलट’सारख्या ‘जनएआय’ साधनांचा वापर करत आहेत. जागतिक स्तरावर या साधनांचा अवलंब करण्याच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे. तथापि, अहवालात म्हटले आहे की केवळ ३१ टक्के नियोक्ते ही साधने प्रभावीपणे वापरण्यास तयार आहेत.

Related Articles