पंचनामे पूर्ण होताच मदतीचे वाटप   

विजय चव्हाण

मुंबई  : राज्यात मार्च-एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांत, तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकार्‍यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून, पंचनामे पूर्ण होताच सरकारच्या धोरणानुसार मदतीचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
 
विधान परिषद सदस्य  राजेश राठोड, अभिजित वंजारी, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि वीज पडण्याच्या घटनांमुळे झालेल्या शेतीपिकांच्या आणि जनजीवनाच्या नुकसानीबाबत मदतीचे वाटप करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. जाधव-पाटील पुढे म्हणाले की, राज्यात वीज पडून ६३ जणांचा मृत्यू झाला असून    
 
त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने प्रत्येकी ४ लाखांची मदत जाहीर केली आहे. ज्यांना अद्याप मदत मिळाली नाही त्यांना दोन दिवसांत ती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  एकूण ७५,३५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १,६८,७५० शेतकरी प्रभावित झाले आहेत. यासाठी सुमारे २१३ कोटींची नुकसान भरपाई अपेक्षित आहे.

Related Articles