अहमदाबाद विमान दुर्घटना   

वैमानिक सुमित सबरवाल यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार 

मुंबई : अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक १७१ विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले वैमानिक कॅप्टन सुमित सबरवाल (वय ५६) यांच्या पार्थिवावर मंगळवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे वडील पुष्कराज, मुलगा आणि कुटुंबियांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेऊन त्यांना अखेरचा निरोप दिला.
 
सुमित सबरवाल यांच्या पार्थिावर चकला उपनगरमधील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वडिलांसह कुटुंबातील सदस्य आले होते. सकाळी सबरवाल यांचा मृतदेह शवपेटीतून विमानाने मुंबई विमानतळावर आणला. तेथून पवई येथील जल वायू विहार येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आली. तेथे त्यांचे मित्र, नातेवाइक आणि कुटुंबातील सदस्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यामध्ये उद्योगपती निरंजन हिरानंदानी, आमदार दिलीप लांडे यांचा समावेश होता. मुलाची शवपेटी पाहताच वडिलांना आश्रू अनावर झाले. ते अत्यंत भावनिक झाले होते.नंतर शवपेटी चकला येथील स्मशानभूमीत नेण्यात आली. 
 
सुमित सबरवाल कुशल वैमानिक
 
सुमित सबरवाल हे अत्यंत कुशल वैमानिक होते. त्यांना ८ हजार तासांच्या विमान उड्डाणाचा अनुभव होता. ते अन्य वैमानिकांना प्रशिक्षणही देत होते. सह वैमानिक क्लाईव्ह कुंदर यांना एक हजार १०० तासांचा अनुभव होता. दुपारी १ वाजून ३९  मिनिटांनी विमानाने यशस्वी उड्डाण केले होते. त्यानंतर काही क्षणात ते कोसळले होते. तत्पूर्वी सबरवाल यांनी  विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा मे डे हा संदेश विमान निंयंत्रण कक्षाकडे पाठवला होता.
 
मैथिली पाटील यांना अखेरचा निरोप
  
विमान कर्मचारी मैथिली पाटील यांच्या पार्थिवावर रायगड जिल्ह्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, नागरिक आणि निकटवर्तीय उपस्थित होते. दरम्यान, सबरवाल आणि मैथिली पाटील यांचे पार्थिव अहमदाबादमधून मुंबईत सोमवारी आणले. तत्पूर्वी डीएनए चाचणी करुन त्यांची ओळख पटविली होती.
 
१६५ जणांची ओळख पटली; १२० मृतदेह कुटुंबाना दिले
 
अहमदाबाद विमान दुर्घटनेत २७० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचा होरपळून मृत्यू झाला होता. मृतदेहांचा कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटविण्याचे काम डीएनए चाचणीद्वारे केले जात आहे. आतापर्यतं १६५ जणांची ओळख पटली असून १२० जणांचे मृतदेह कुटुंबाकडे देण्यात आले आहेत. दरम्यान, लंडनकडे जाणारे विमान १२ जून रोजी अहमदाबाद येथे उड्डाणानंतर कोसळले होते. त्यात वैमानिक  सुमित सबरवाल, सह वैमानिक क्लाईव्ह कुंदर.आणि दहा विमान कर्मचारी यांचा मृत्यू झाला होता. बी. जे वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहावर विमान कोसळून पाच विद्यार्थ्यांसह २९ जणांचा मृत्यू झाला होता. 

Related Articles