पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी   

पुणे : शहरातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्रक्रिया तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्यावर अडली आहे. त्यामुळे शहरातील लहान-मोठे अशा एकूण ६६२ पुलांचे ऑडिट होणे अद्याप बाकी आहे.शहरातून मुळा आणि मुठा या दोन मोठ्या नद्या, राम नदी तसेच आंबिल ओढा, माणिक नाला, भैरोबा नाला, नागझरी आदी मोठे ओढेही आहेत. या नदी आणि ओढ्यांवर पुलांची उभारणी केली गेली आहे. मागील काही वर्षांत पावसाचे स्वरुप बदलले आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना घडत आहेत. मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील पूल आणि कल्व्हर्टच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या विषयाबाबत माहिती घेतली असता, हा विषय अद्याप तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्यावरच अडकून पडला असल्याचे समजले.
 
महापालिकेच्या भवन विभागाने यापूर्वी शहरातील मोठ्या ९८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले होते. त्यापैकी ३८ पुलांच्या कामांमध्ये ११ पुलांचे काम करण्यास प्राधान्य दिले गेले. यानुसार या पुलांच्या दुरुस्तीची काम केली गेली आहे. या ११ पुलांव्यतिरीक्त आणखी २७ पुलांच्या कामासाठी सत्तावीस कोटींची आवश्यकता आहे. त्यापैकी यावर्षीच्या अंदाजपत्रकात दहा कोटींची तरतूद केली गेली आहे. त्यांची कामे केली जाणार आहेत.
 
दरम्यान, गेल्यावर्षी महापालिकेने शहरातील इतर पूल आणि कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सुमारे साडे सहाशे पूल आणि कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. या निविदा प्रक्रियेत तीन संस्थांनी सहभाग घेतला आहे. हे काम पाच वर्षांच्या मुदतीचे आहे. पहिल्या वर्षांत सर्व पूल आणि कल्व्हर्टची तपासणी करून अहवाल सादर करायचा आहे, त्यानंतर दरवर्षी याच पद्धतीने अहवाल तज्ज्ञ सल्लागारामार्फत महापालिकेला दिला जाईल, अशी माहिती प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी दिली.
 
साधारणपणे वीस वर्षांहून अधिक जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले. त्यानुसार, वि. भा. पाटील पूल (बोपोडी), एस. एम. जोशी पूल (नवी पेठ),वीर सावरकर पूल (कर्वे रस्ता), राजीव गांधी पूल (औंध), कात्रज कोंढवा रस्ता (कात्रज गावठाण), न्यू संगम ब्रिज आणि आगाखान ब्रिज (कल्याणीनगर) या पुलांची कामे पूर्ण होत आली आहेत.

Related Articles