फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून   

माहिती लपवणार्‍या अधिकार्‍यांवर होणार कारवाई?

पुणे : शहरातील सर्वच रस्त्यांना धोकादायक फलकाचा विळखा असताना महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरात केवळ २४ अनधिकृत  फलक असल्याची माहिती नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांना दिली आहे. ही माहिती अविश्वसनीय असल्याने नमूद करत महापालिका आयुक्तांनी विशेष पथकाद्वारे फलकांची तपासणी करून दोषींवर करवाई करण्याचा इशारा दिला आहे, तसेच आठवड्याभरात अनधिकृत फलक काढून संबंधितांवर पोलिस कारवाई करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
 
महापालिका हद्दीत कोठेही फलक उभे करण्यासाठी परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते. महापालिकेने परवानगी दिलेल्या फलकाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची व दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी संबंधित फलक मालकावर असते. मात्र, महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरातील विविध रस्ते, चौक, पदपथ, इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फलक आणि फ्लेक्स उभारले जातात. यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडते. अशा बेकायदेशीर जाहीरात बाजीवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. अनधिकृत फलकाला ५० हजार रुपये तर अनधिकृत फ्लेक्स व जाहिरात फलकाला प्रत्येकी एक हजार रुपये दंड केला जातो. मात्र, अधिकारी, कर्मचारी आणि व्यावसायिकांचे लागेबांधे आणि त्याला मिळणारे राजकीय पाठबळ यामुळे कारवाईला लगाम लागतो. त्यामुळे शहरात अनधिकृत फ्लेक्सबाजी, जाहिरातबाजी आणि फलकाचा आलेख दिवसेंदिवस वाढताच आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते.
 
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहराती फलकाचा आढावा घेतला. यामध्ये आकाशचिन्ह व परवाना विभागाने महापालिका हद्दीत केवळ २४ अनधिकृत फलक असल्याची माहिती दिली. ही माहिती अविश्वासनीय व आश्चर्य करणारी असल्याने आयुक्ती विशेष पथ नेमून फलकाची तपासणी करणार असल्याचे सांगितले. अनधिकृत आढळलेल्या फलकावर तातडीने कारवाई करून संबंधितांवर पोलिस कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
 
शहरात मोठ्या प्रमाणावर फलक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. अनेक फलक नियमावली डावलून उभारले असल्याचे दिसते. बेकायदा आणि नियमांचे पालन न करता परवानगी घेउन उभारलेल्या फलकाचा अहवाल क्षेत्रिय कार्यालयांकडून मागविला आहे. अशा फलकावर आठवड्याभरात कारवाई करून अहवाल न दिल्यास संबंधीत सहाय्यक आयुक्तावर कारवाई करण्यात येईल.
 
- नवल किशोर राम, महापालिका आयुक्त

Related Articles