बेकायदा वीज जोडणी करणार्‍यांवर महापालिकेची जुजबी कारवाई   

पुणे : महापालिकेच्या सार्वजनिक पथदिव्यांच्या खांबांमधून बेकायदेशीरपणे वीज जोडणी करणार्‍यांवर जुजबीच कारवाई केली गेली आहे. ८७ ठिकाणचे वीजजोड तोडण्यात आले असून, पुन्हा एकदा वीज चोरी केली तर संबंधितांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली जाईल, असे विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांनी नमूद केले आहे.काही दिवसांपूर्वी नाना पेठेतील इनामदार चौकात एका लहान मुलीला एका खांबावरील फलकाममधून वीजेचा धक्का बसल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिकेने बेकायदा वीजजोडांची तपासणी सुरू केली होती. त्यातून ही बाब समोर आली आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे संपूर्ण शहरात विद्युत खांबांची तपासणी केली जात आहे. यापुर्वी१५० हून अधिक ठिकाणी वीज चोरी होत असल्याचे समोर आले होते. 
 
या बेकायदा जोडण्या तातडीने तोडण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांत ८७ ठिकाणी वीज चोरी उघड झाली आहे. यामध्ये नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय, कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दहा किंवा त्यापेक्षा अधिक वीज चोरी आढळून आली आहे. इतर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कमी जास्त प्रमाणात वीज चोरी आढळून आली आहे. या संदर्भात महापालिकेच्या विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा शेकटकर म्हणाल्या, ‘तुर्तास वीज चोरी करणार्‍यांना समज दिली जात आहे. पुन्हा एकदा वीज चोरी केल्यास संबंधितांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली जाईल. यापूर्वी अशा तक्रारी केल्या आहेत.’

Related Articles