पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ   

खडकवासला परिसरात जोरदार पाऊस

पुणे : खडकवासला प्रकल्पातील चारही धरण क्षेत्रात रविवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चांगला पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळीत वाढ झाली. खडकवासला प्रकल्पात आतापर्यंत ५.७७ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच १९.८१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टीएमसीने अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.
 
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या धरणांमध्ये रविवारपासून पावसाने चांगली हजेरी लावली. रविवारी सायंकाळपासून सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत खडकवासल्यात ४७ मिलिमीटर, पानशेत आणि वरसगावमध्ये प्रत्येकी ९३ मिमी; तसेच टेमघरमध्ये ८० मिमी पाऊस झाला आहे.  धरणात त्यामुळे ५.४५ टीएमसी (१८.७० टक्के) पाणीसाठा जमा झाला होता. धरणातील पावसाचा जोर सोमवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच पर्यंत कमी झाला असला, तरी पाऊस झाल्याची नोंद जलसंपदा विभागाने केली आहे.
 
खडकवासल्यात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १३ मिमी, पानशेतमध्ये १९ मिमी, वरसगावमध्ये ३० मिमी आणि टेमघरमध्ये २५ मिमी पाऊस झाल्याने धरण प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढली. प्रकल्पांत ५.७७ टीएमसी; तसेच १९.८१ टक्के पाणी जमा झाले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ३.८० टीएमसी पाणीसाठा जमा होता. खडकवासला धरणात आतापर्यंत १९५ मिलिमीटर पाऊस झाला. पानशेत २०२, वरसगाव २१६ मिमी आणि टेमघरमध्ये २३३ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली.

पाणी सोडल्याची अफवा

खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे, अशा आशयाचा एक संदेश सोमवारी दिवसभर ‘व्हायरल’ झाला. त्या प्रकारच्या संदेशामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. मात्र, अशा प्रकारचा कोणताही संदेश खडकवासला विभागामार्फत पाठविण्यात आला नाही. धरणातून पाणी सोडण्याचा संदेश अधिकृतरीत्या पाठविला जाईल, असे कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.

धरणांतील पाण्याचा उपलब्ध साठा (टीएमसी)

धरणाचे नाव पाणीसाठा ('टीएमसी'मध्ये) टक्केवारी
खडकवासला : ०.९५ - ४८.३१
टेमघर : ०.०७ - १.९७
वरसगाव : ३.०९ - २४.१६
पानशेत : १.६५ - १५.४९
एकूण : ५.७७ - १९.८१
 

Related Articles