घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी   

नवी दिल्ली : खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे मे महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाई वाढीचा दर १४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे ०.३९ टक्के नोंदविला गेला. मार्च २०२४ मध्ये हाच दर ०.२६ टक्के होता. दरम्यान, भू-राजकीय तणावामुळे घाऊक महागाई दरात वाढ होऊ शकते, असेही वर्तविण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात हाच दर ०.८५ टक्के इतका होता. तर, मार्च आणि फेब्रुवारीमध्ये हाच दर अनुक्रमे २.०५ आणि २.३८  होता. मागील वर्षी मे महिन्यात हा चर २.७४ टक्के होता.
 
मे महिन्यात अन्नधान्य चलनवाढीचा दर १.५६ टक्के नोंदवला गेला. मे महिन्यात भाजीपाला महागाईचा दर २१.६२ टक्के होता. एप्रिलमध्ये हाच दर १८.२६ टक्के नोंदवला गेला. इंधन आणि वीज दर वाढीचा दर मे महिन्यात मे महिन्यात २.२७ टक्के आणि एप्रिलमध्ये २.१८ टक्के  होता.गेल्या आठवड्यात  किरकोळ महागाईचा दर २.८२ टक्के नोंदवला गेला होता. सहा वर्षांनंतर किरकोळ महागाई दर नीचांकी आला होता. 
 
चलनवाढ ४ टक्क्यांपेक्षा कमी राहावी, यासाठी रिझर्व बँकेकडून नानाविध प्रयत्न केले जात आहेत. याअंतर्गत रिझर्व बँकेने नुकतीच रेपो दरात ०.५० बेसिस पॉइंटची कपात केली होती. तसेच, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रोख राखीव प्रमाणातही एक टक्क्यांची कपात केली होती. विशेष म्हणजे, मागील तीन बैठकांत रिझर्व बँकेने रेपो दरात १ टक्के कपात केली आहे.
 
रिझर्व बँकेने मे २०२० नंतर फेब्रुवारी महिन्यात प्रथमच रेपो दरात पाव टक्क्यानी कपात केली होती. त्यापाठोपाठ एप्रिलमध्ये पाव टक्का कपात करण्यात आली होती. तर, मागील आठवड्यात अर्धा टक्का कपात करण्यात आली होती.
 

Related Articles