कष्टकर्‍यांनी वाचला मंत्र्यांपुढे समस्यांचा पाढा   

पणन व कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मागील थकीत तोलाई मजुरीसह सध्याची थकबाकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. बाजार आवारात डमी व बिगर नोंदीत वाराई, हमाल कामगारांची संख्या वाढल्याने प्रचलित वाराई, हमाल टोळ्यांमधील कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, उच्च न्यायालयाने आदेश देऊनही खासगी बाजार समितीमध्ये माथाडी कायद्याची अमंलबजावणीस टाळाटाळ होत आहे. आदी समस्यांचा पाढाच महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी पणनमंत्री व कामगार मंत्र्यांसमोर वाचला. त्यावर पणन व कामगार मंत्र्यांनी कायद्यातील तरतुदी तपासून पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
 
राज्यातील बाजार समितीमधील हमाल मापाडी यांच्या प्रश्नांबाबत पणन मंत्री जयकुमार रावल आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात हमाल, माथाडी, कामगार संघटना प्रतिनिधींची बैठक झाली. विधान परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या पणन विभागाशी संबंधित हमाल मापाडी माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पणन व कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. 
 
यावेळी, महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष विकास मगदुम, सहचिटणीस हणुमंत बहिरट, पुणे हमाल पंचायतीचे जनरल सचिव गोरख मेंगडे, संघटक संदीप मारणे, धुळे हमाल पंचायत व बाजार समितीचे हमाल प्रतिनिधी संचालक भागवत चितळकर, साक्री बाजार समितीचे हमाल प्रतिनिधी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील उपस्थित होते.
 
वाराई (वारणार) कामगार नोंदीत नसताना अनधिकृतपणे काम करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उच्च न्यायालयाने आदेश देऊन ही खासगी बाजार समितीमध्ये माथाडी कायद्याची अमंलबजावणी होत नसल्यास कायद्यातील तरतुदी तपासण्यात येतील. त्यानंतर, संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी, हमाल माथाडी संघटना यांच्याशी बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर बाजार समितीच्या अनुज्ञप्तीधारक माथाडी कामगारांना बाजार समितीच्या सेवेत घेणे बाबत अहवाल सादर करणे बाबतचे निर्देशही पणन व कामगार मंत्री यांकडून पणन विभागाला देण्यात आल्याची माहिती पदाधिकार्‍यांनी दिली.

तोलाईची वसुली व्हावी

पुणे बाजार समिती २०२२ पासून तोलाई वसुली करीत आहे. परंतु, अद्यापही ४० ते ४५ टक्के अडते तोलाई बाजार समितीकडे भरत नाही. २०२२ पूर्वी पुणे माथाडी मंडळाकडे तोलाई वसुली केली होती. त्या काळातील साधारणपणे सात कोटी रुपये वसुली होणे बाकी आहे. 
 
- हणुमंत बहिरट, सहचिटणीस,महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळ.

Related Articles