कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले   

पिंपरी : मावळ तालुक्यातील इंदोरीतील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेनंतर हाती घेतलेले शोधकार्य सोमवारी थांबविण्यात आले.तळेगाव एमआयडीसी पोलिस, रायगड आपत्ती व्यवस्थापन पथक आणि चार स्थानिक बचाव पथकांच्या माध्यमातून काल दुपारी दोनपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. यासाठी ’ड्रोन’ची देखील मदत घेण्यात आली. काल एकही मृतदेह सापडला नाही. तसेच, कोणी बेपत्ता असल्याची तक्रार नसल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. 
 
दरम्यान, ५० जखमींपैकी ३५ जण उपचारानंतर घरी परतले असून ११ जणांवर अतिदक्षता विभागात तर चौघांवर सर्वसाधारण कक्षात उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल कोसळून रविवारी चार पर्यटकांचा मृत्यू झाला. तर, ५० जण जखमी झाले होते. दरम्यान, म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांना बेपत्ता नागरिकांबाबत लक्ष ठेवण्याबाबत कळविण्यात आले आहे.         
 
कुंडमळा येथील पूल कोसळल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय झाली. बेगडेवाडी रेल्वे स्थानकाकडे येणार्‍या शेलारवाडी, कुंडमळा, सांगुर्डी, इंदोरी, कान्हेवाडी, येलवाडी, सुदवडी या भागातील सुमारे २० हजार नागरिकांचा संपर्क तुटला आहे. विद्यार्थी, दूध विक्रेते, फूल विक्रेते, शेतकरी यांना पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराकडे येण्यासाठी इंदोरी मार्गे तळेगाव दाभाडे असा १४ किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागणार आहे.
 
निधी मंजूर; पण कामाला विलंब...
 
शेलारवाडी येथे संरक्षण दलाच्या डेपोकडून दुसर्‍या बाजूला जाण्याकरिता इंद्रायणी नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी सरकारने आठ कोटींचा निधी ११ जुलै २०२४ रोजी मंजूर केला आहे. पुलाची रचना, निविदा प्रक्रिया, संरक्षण विभागाची मान्यता यामध्ये एक वर्षाचा कालावधी गेला. १० जून २०२५ रोजी पुलाच्या कामाचा कार्यारंभ आदेश दिला आहे. पण, अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. पावसाळ्यात नदीतील पाण्याच्या प्रवाहामुळे काम करणे शक्य होणार नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Related Articles