पैनगंगा नदीला पूर, हिंगोलीत पिकांचे मोठे नुकसान   

हिंगोली : विदर्भात गुरुवारपासून पावसाची संततधार सुरू असून, अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पैनगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका हिंगोली जिल्ह्याला बसला आहे. हिंगोलीत अनेक ठिकाणी शेतशिवारात पुराचे पाणी गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. 
    
हिंगोली जिल्ह्यात पेरणी केलेली पिके सुकून जात असताना शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला होता. तोच मागील दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पैनगंगा नदी पात्राच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या शेतीत पाणी घुसले असून, सोयाबीन, हळद यांसारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. हजारो हेक्टर शेती पूर्णपणे खरडून गेली आहे. संत्रा, आंबा फळबागा, तसेच हळद आणि सोयाबीन पिके वाहून गेली आहेत. तर आंचळ गावात ड्रिप सिंचनाचे पाईपसुद्धा वाहून गेले आहेत. प्रामुख्याने कनेरगाव परिसरातील भगवती, तपोवन, गारखेडा, सवना गावातील शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. दरम्यान, सरकारने शेतकर्‍यांना या नुकसानीच्या खाईतून वाचवण्यासाठी आता पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. कुकसा ते मांगुळझनक मार्ग पूर्णतः बंद झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काच नदीवरील पूल आणि आंचळ गावातील नाल्याचा पूल पूर्णपणे वाहून गेला आहे.

Related Articles