मार्केटयार्डातील काम बंद आंदोलन मागे   

पुणे : मार्केटयार्डातील फळे, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभागातील कामगारांना होणार्‍या मारहाणीच्या निषेधार्थ येत्या सोमवारी श्री छत्रपती कामगार संघटनेतर्फे काम बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, बाजार समिती प्रशासनाने रात्रीच्या वेळी सुरक्षेत वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे काम बंदचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा कामगार संघटनेचे अध्यक्ष व बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे यांनी दिली. 
 
कांदा-बटाटा विभागात सर्व कामगार, आडते, खरेदीदार यांची संयुक्त बैठक पार पडली. रात्रीच्या वेळी परिसरातील हॉटेल, टपर्‍या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच येत्या आठवडाभरात सुरक्षेतही वाढ करण्यात येणार असल्याचे आश्वासन विभाग प्रमुख प्रशांत गोते यांनी दिले. त्यामुळे या बैठकीत काम बंदचा निर्णय मागे घेण्यात आला. मात्र, बाजार समिती प्रशासनाने दिलेले आश्वासन मागे न घेतल्यास येत्या ३ जुलैपासून कांदा-बटाटा विभाग बंद ठेवू. तसेच रात्री उशीरा हॉटेल व टपर्‍या सुरू राहिल्यास कामगार ते बंद करतील, असा इशाराही संतोष नांगरे यांनी यावेळी दिला. 
 
या बैठकीला बाजार समितीचे संचालक अनिरूद्ध भासले, विशाल केकाणे, शशिकांत नांगरे, संजय साष्टे, राजेंद्र कोरपे, समीर रायकर, अविनाश मोरडे, विभाग प्रमुख प्रशांत गोते, नितीन चौरे, सुरक्षा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
 

Related Articles