दुसर्‍यांचा जीव वाचविण्याऐवजी फोटोसाठी सुरु होती धडपड!   

कुंडमळा पूल दुर्घटना 

पिंपरी : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे लोखंडी अरुंद पादचारी पूल रविवारी कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ५० पेक्षा अधिक जण जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात कासारवाडी येथील पती पत्नी सुदैवाने बचवले आहेत. योगेश आणि शिल्पा भंडारे अशी त्यांची नाव आहेत. मदतीसाठी याचना करताना योगेश आणि त्यांच्या पत्नीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात योगेश मदतीसाठी याचना करताना दिसत आहेत. या दुर्घटनेचा थरारक अनुभव त्यांनी सांगितला आहे.
 
हे दाम्पत्य कुंडमळा येथे निसर्गाचा आणि निखळ वाहणार्‍या पाण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. यावेळी योगेश यांनी त्यांचा थरारक अनुभव सांगितला आहे.योगेश आणि शिल्पा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोघांचा पाय फॅक्चर झाला आहे.
 
योगेश म्हणाले, देवाच्या कृपेने त्या घटनेतून आम्ही वाचलो. माझी पत्नी आणि मी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तिथे गेलो होतो. पूल कोसळला त्याच्या मधोमध आम्ही होतो. त्यामुळे आम्ही आत अडकलो. पुढे- मागे जाता आले नाही. पूल हालत होता, डगमगत होता. पुलावर दुचाकी आणल्या जात होत्या. त्यांना आम्ही सांगत होतो. दुचाकी आणू नका. मंदिरात जाण्यासाठी अनेकजण त्या लोखंडी पूलाचा आधार घेत होते. मोठी गर्दी झाली होती. घटना घडली तेव्हा डोळे बंद केले होते. 
 
डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता. जगेल याची शास्वती नव्हती. माझ्या पत्नीला आणि माझ्या पायाला फॅक्चर झाले आहे. स्थानिकांनी आम्हाला मदत केली. जीव वाचवण्यापेक्षा काही जण फोटो काढत होते. वाचवा-वाचवा म्हणत होतो. अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली. स्थानिक नागरिकांनी आम्हाला वाचवले आहे. पुलावर जाण्यास बंदी होती. सर्वांनी सुरक्षित पर्यटन करावे, असे आवाहनही योगेश यांनी पर्यटकांना केले आहे.

Related Articles