‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?   

नायरला संधी की अर्शदीपचे पदार्पण?

नवी दिल्ली  : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौर्‍यावर आहे, जिथे त्यांना यजमान इंग्लंड संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून लीड्स येथील हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडवर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू इंग्लंडच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असून जोरदार सराव करत आहेत.
 
लीड्स कसोटीसाठी भारतीय संघाची अंतिम ११ खेळाडूंची निवड चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. या पहिल्या कसोटीत अनुभवी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांच्याकडून सलामीची अपेक्षा आहे. राहुल-जैस्वाल जोडीमुळे लेफ्टी-राईटी फलंदाजीच्या कॉम्बिनेशनचा फायदा मिळेल. दुसरीकडे, नवा कर्णधार शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. गिलने अलीकडच्या काळात तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, परंतु विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर त्याचे चौथ्या स्थानावर स्थलांतर होऊ शकते.
 
शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर खेळल्यास तिसर्‍या क्रमांकाची जागा रिकामी राहील. ज्यासाठी साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन आणि करुण नायर हे दावेदार आहेत. या तिघांमध्ये नायरचा दावा सर्वात मजबूत मानला जात आहे. त्याचे तब्बल ८ वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही नायरला लीड्स कसोटीत संधी मिळण्याचे संकेत दिले होते.
 
पाचव्या क्रमांकावर यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आणि सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू रवींद्र जडेजा खेळताना दिसू शकतात. तर अष्टपैलू नीतीश रेड्डीला शार्दुल ठाकूर ऐवजी प्राधान्य मिळू दिले जाण्याची दाट शक्यता आहे. तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. नीतीशने ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आपल्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेतही सातव्या क्रमांकावर खेळून उत्तम कामगिरी केली होती. दुसरीकडे शार्दुल ठाकूरने इंट्रा स्क्वॉड सामन्यात शतकी खेळी केली असली, तरी त्याला कदाचित लीड्स कसोटीत बाहेर बसावे लागू शकते.
 
गोलंदाजीतील निवड
 
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा अंतिम ११ मध्ये समावेश जवळपास निश्चित आहे. तसेच, फिरकी गोलंदाज म्हणून चायनामन कुलदीप यादवला संधी मिळू शकते. पण त्याला भारतीय उपखंडाबाहेर कसोटी खेळण्याचा अनुभव कमी असून हीच बाब त्याच्यासाठी नकारात्मक ठरू शकते. मात्र, कोणत्याही खेळपट्टीवर गोलंदाजीला फिरकी देण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, त्यामुळे त्याचे पारडे जड मानले जात आहे.
 
प्रसिद्ध की अर्शदीप?
 
प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंह यांच्यापैकी कोणाला संधी मिळेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. अर्शदीपच्या निवडीमुळे संघाला डावखुर्‍या वेगवान गोलंदाजाचा पर्याय मिळेल. अर्शदीपने अद्याप कसोटी पदार्पण केलेले नाही. पण त्याला व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी खेळण्याचा मोठा अनुभव आहे.
 
इंग्लंड दौर्‍यासाठी १८ सदस्यीय भारतीय संघ
 
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), नीतीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
 
इंग्लंडचा संघ
 
बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.
 
मालिकेचे वेळापत्रक
* पहिली कसोटी : २०-२४ जून (हेडिंग्ले, लीड्स)
* दुसरी कसोटी : २-६ जुलै (एजबेस्टन, बर्मिंगहॅम)
* तिसरी कसोटी : १०-१४ जुलै (लॉर्ड्स, लंडन)
* चौथी कसोटी : २३-२७ जुलै (ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर)
* पाचवी कसोटी : ३१ जुलै-४ ऑगस्ट (द ओव्हल, लंडन)

Related Articles