प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने   

पुणे : महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ मध्ये सोमवारी तीन सामने खेळले जाणार होते. मात्र, सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सकाळच्या आणि दुपारच्या सत्रातील सामने थांबवण्यात आले आहेत. हे सामने आज मंगळवारी (१७ जून) खेळले जातील. मात्र, त्याचवेळी ईगल नाशिक टायटन्स संघाचा कर्णधार प्रशांत सोलंकी याने पाऊस काहीसा थांबल्यानंतर केलेल्या एका कृतीमुळे त्याची सर्वत्र वाहवा होत आहे.
 
सोमवारी सकाळपासून गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पावसाचे आगमन झाले होते. त्यानंतर रत्नागिरी जेट्स विरुद्ध रायगड रॉयल्स हा सामना विलंबाने सुरू होईल असे सांगण्यात आले. मात्र, पावसाने जोर धरल्यामुळे हा सामना स्थगित केला गेला. दुपारच्या सत्रात पावसाने काहीशी उघडीप घेतली. त्यावेळी मैदानावरील कर्मचार्‍यांनी प्रयत्नांची शर्थ करत, मैदान कोरडे करण्याचा प्रयत्न केला.
 
मैदान कर्मचार्‍यांच्या या कामात त्यांना मदत करण्यासाठी ईगल नाशिक टायटन्स संघाचा कर्णधार प्रशांत सोलंकी धावला. मैदानावरील कव्हर हटवताना तो दिसला. तसेच, त्या कव्हर्सवर साचलेले पाणी काढताना त्याने या कर्मचार्‍यांना मदतीचा हात दिला. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुपारच्या सत्रात ईगल नाशिक टायटन्स व पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांच्या दरम्यान सामना खेळला जाणार होता.

Related Articles