जगातील नऊ देश अण्वस्त्रसंपन्न   

इराणने आपला अणुकार्यक्रम राबवू नये, समृद्ध युरेनियमचा साठा करण्याऐवजी अणुकरार करण्यासाठी पावले उचलावीत, इस्रायलच्या हल्ल्यानंतर हीच अणुकरार करण्याची संधी आहे. ती इराणने सोडू नये, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर केवळ नऊ देशांकडेच अण्वस्त्रे का?, अन्य देशांकडे का नाहीत? 
 
या संदर्भात जाणून घेऊ...

‘या’ देशांकडे आहेत अण्वस्त्रे  

जगातील अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया हे नऊ देश अण्वस्त्रसंपन्न आहेत. अमेरिका आणि रशिया हे अण्वस्त्रांच्या केंद्रस्थानी आहेत, जगातील एकूण १२ हजार १२१ अण्वस्त्रांपैकी जवळपास ९० टक्के अण्वस्त्रे त्यांच्याकडे आहेत. 

इतर देशांकडे अण्वस्त्रे का नाहीत?

अणुबॉम्ब बनविण्यासाठी युरेनियम समृद्धीकरण ते अणुविखंडन यासारख्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. अनेक देशांकडे अणुबॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला  नाही. मात्र, काही देश तांत्रिकदृष्ट्या अणुबॉम्ब बनवण्यास सक्षम आहेत, मात्र ते  बनवत नाहीत. याचे कारण म्हणजे अण्वस्त्र प्रसारबंदी करार. 

अण्वस्त्र प्रसारबंदी करार काय आहे? 

अण्वस्त्रांचा प्रसार थांबवण्यासाठी आणि जगाला या धोक्यापासून वाचवण्यासाठी १९६८ मध्ये अण्वस्त्र प्रसारबंदी करार करण्यात आला होता; परंतु हा करार १९७० मध्ये पूर्ण अंमलात आला. या करारावर १९० देशांनी स्वाक्षरी केली होती. या करारानुसार कोणताही नवीन देश अण्वस्त्रे विकसित करणार नाही. या करारानुसार केवळ अमेरिका, रशिया, ब्रिटन, चीन आणि फ्रान्स यांनाच अण्वस्त्रे बाळगण्याची परवानगी होती, कारण या देशांनी करार अंमलात येण्यापूर्वीच अण्वस्त्रे विकसित केली होती. 

‘या’ चार देशांकडे अण्वस्त्रे कशी? 

करारानुसार केवळ पाच देशांनाच अण्वस्त्रे ठेवण्याचा अधिकार होता. तरीही भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया या चार देशांनी अण्वस्त्रे कशी विकसित केली. कारण या चार देशांनी कधीही अण्वस्त्र करारावर स्वाक्षरी केली नाही. 

अमेरिकी तंत्रज्ञानाचा वापर 

अमेरिकेत रशियन हेर सक्रिय होते. मॅनहॅटन प्रकल्पातील १२ शास्त्रज्ञांपैकी एक २० वर्षांचा थियोडोर हॉल होता. त्याचा रशियन वंशाचा मित्र सॅव्हिल सॅक्सने मॅनहॅटन प्रकल्पाची माहिती मिळवली आणि ती रशियाला पाठवली. २९ ऑगस्ट १९४९ रोजी रशियाने आरडीएस- १ नावाच्या बॉम्बची यशस्वी चाचणी केली.अमेरिकेव्यतिरिक्त, कॅनडा आणि ब्रिटनमधील शास्त्रज्ञदेखील मॅनहॅटन प्रकल्पात सहभागी होते. बॉम्ब बनवल्यानंतर अमेरिकेने अंतिम संशोधन ब्रिटनला देण्यास नकार दिला.  

चीनने अणुबॉम्ब कसे बनवले?

चीनकडे स्वतःचे युरेनियम साठे होते. त्यामुळे चीनने १९५७ मध्ये सोव्हिएत संघाच्या मदतीने अणु तंत्रज्ञानावर काम सुरू केले.१९६० मध्ये जेव्हा त्यांना सोव्हिएत संघाकडून तांत्रिक मदत मिळणे बंद झाले, तेव्हा त्यांनी कियान सांकियांगसारख्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली युरेनियम समृद्ध केले आणि १६ ऑक्टोबर १९६४ रोजी अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली.  

फ्रान्सच्या मदतीने इस्रायलची अण्वस्त्रनिर्मिती 

१९५० च्या दशकात इस्रायलने फ्रान्सच्या मदतीने प्लुटोनियम समृद्धीसाठी अणु संशोधन केंद्र सुरू केले. १९६३ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या दबावाखाली इस्रायलने नेगेव वाळवंटात बांधलेल्या या कथित संशोधन केंद्राची पाहणी केली; परंतु बॉम्ब बनवल्या जाणार्‍या भूमिगत सुविधा लपवून ठेवल्या. १९६७ पर्यंत इस्रायलनेही अणुबॉम्ब बनवला होता.

कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रे? 

स्वीडिश थिंक टँक आणि स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या  अलीकडच्या अहवालानुसार, रशियाकडे ५ हजार ५८०, अमेरिकेकडे ५ हजार ४४, चीन ५००, फ्रान्स २९०, ब्रिटन २२५, भारत १७२, पाकिस्तान १७०, इस्रायल ९० आणि उत्तर कोरियाकडे ५० अणुबॉम्ब आहेत. या अण्वस्त्रसंपन्न देशांनी त्यांच्या अण्वस्त्रांचे अलीकडच्या काळात आधुनिकीकरण केले आहे.

जगातील पहिला अणुबॉम्ब कसा बनवला गेला?

रॉबर्ट ओपेनहायमर यांना दुसर्‍या महायुद्धादरम्यान तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपतींनी मॅनहॅटन प्रकल्पांतर्गत लॉस अलामोस लॅबचे संचालक म्हणून नियुक्त केले होते. त्यावेळी अणुबॉम्बच्या विकासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. तीन वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर १६ जुलै १९४५ या दिवशी पहिल्या अणुबॉम्बची चाचणी घेण्यात आली. त्याचे नाव ट्रिनिटी ठेवण्यात आले. ओपेनहायमर त्याच्या सहकार्‍यांसह एका बंकरमध्ये होते, जिथून १० किलोमीटर अंतरावर जगातील पहिली अणुचाचणी घेण्यात आली. रॉबर्ट ओपेनहायमर यांना अणुबॉम्बचे जनक मानले जाते. 

भारतातील पहिला अणुबॉम्ब कोणी बनवला?

७ सप्टेंबर १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अणुविखंडन यंत्रावर काम करण्यास परवानगी दिली होती. भाभा अणु संशोधन केंद्रातील जवळपास ७५ शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या एका पथकाने अणुबॉम्बची रचना आणि विकास करण्याची प्रक्रिया सुरू केली. या पथकाचे प्रमुख राजा रामण्णा होते. 
 

Related Articles