चहापानावर बहिष्कार   

मुंबई,(प्रतिनिधी) : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आज (सोमवार) पासून सुरू होत आहे. विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची जोरदार तयारी विरोधकांनी केली आहे. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग, शेतकरी कर्जमाफी, मंत्र्यांचा भ्रष्टाचार, सत्ताधारी नेत्यांची बेताल वक्तव्ये आदी विषयांवर आक्रमक भूमिका घेऊन, सरकारला जाब विचारू, असे विरोधी पक्षनेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. भ्रष्ट व मस्तवाल सरकारच्या चहापानाला जाण्याचे पाप आम्ही करणार नाही, असे सांगत विरोधकांनी बहिष्काराची घोषणा केली.
 
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन गाजणार अशी चिन्हे दिसत आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आरोप-प्रत्यारोपांच्या बराच गडगडाट झाला. अधिवेशनातील व्यूहरचना ठग़विण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे  यांच्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर   दानवे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली. राज्यातली कायदा सुव्यवस्थेची स्थिती, बोकाळलेला भ्रष्टाचार,  शेतकर्‍यांची स्थिती, भ्रष्टाचारात गुंतलेले मंत्री असे अनेक विषय अधिवेशनात उपस्थित केले जातील, अशी माहिती विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिली. त्याचवेळी शेतकर्‍यांबाबत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा त्यांनी निषेध केला. राज्याला आवश्यक नसलेला शक्तिपीठ महामार्ग रेटण्याचा अट्टाहास,  पुण्याचे हगवणे प्रकरण, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आदी विषय या अधिवेशनात लावून धरणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

Related Articles