सचिन तेंडुलकरचा शफाली वर्माला मोलाचा सल्ला   

नॉटिंगहॅम : भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज आहे. नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर रंगणार्‍या पहिल्या टी-२० सामन्यासह भारत-इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. ही मालिका भारताची सलामीची बॅटर शफाली वर्मासाठी एकदम खास असेल. कारण बर्‍याच दिवसांनी ती संघात कमबॅक करत आहे. 
 
शफाली वर्मा ही आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखली जाते. त्यामुळेच तिचा उल्लेख लेडी सेहवाग असाही केला जातो. पण कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे तिला संघाबाहेर जावे लागले होते. आता ती पुन्हा एकदा भारतीय संघाकडून आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश करताना दिसेल. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरमुळे तिचा कमबॅकचा मार्ग सुकर झालाय. खुद्द शफालीनं यासंदर्भातील खुलासा केला आहे.इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्याआधी बीसीसीआयने ’लेडी सेहवाग’ अर्थात शफालीचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात शफाली आपल्या कमबॅकची स्टोरी शेअर करताना दिसते.
 
तिने म्हटले आहे की, आधी मी प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकार मारण्याचा विचार करायचे. आता मला चांगल्या चेंडूचा सन्मान करण्याचं महत्त्व समजले सचिन सरांच्या (सचिन तेंडुलकर) कसोटीमधील जुन्या खेळी पुन्हा पुन्हा पाहिल्या. यातून प्रेरणा मिळाली. लहान असताना मी त्यांची एकही मॅच मिस करायचे नाही. त्या जुन्या सामन्यांचे व्हिडिओ पुन्हा पाहिले. त्याचा कमबॅकसाठी फायदा झाला, असेही ती म्हणाली आहे.
 
मागील वर्षी  तिच्या वडिलांचे ह्रदयविकाराने निधन झाले. या धक्क्यातून सावरत असतानाच १० दिवसांनी तिला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 
हा काळ खूप कठीण होता, असे सांगत संधीच सोनं करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे ती म्हणाली आहे. २१ वर्षीय बॅटरनं देशांतर्गत क्रिकेट आणि महिला प्रीमियर लीगमध्ये आपली धमक दाखवून दिलीये. आता इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत संघाला तिच्याकडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असेल.

Related Articles