कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला   

अहमदाबाद : एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांनी रविवारी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा (सीव्हीआर)ब्लॅक बॉक्स सापडल्यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे नेमका अपघात का आणि कसा झाला? याचा उलगडा होणार आहे.अहमदाबादहून लंडनकडे २३० प्रवासी आणि १२ कर्मचार्‍यांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी उड्डाणानंतर अवघ्या काही क्षणात कोसळले होते. यामध्ये केवळ एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला होता. मात्र, हे विमान वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलावर कोसळल्याने तेथील २९ जणांनादेखील यात प्राण गमवावे लागले होते. घटनेच्या दुसर्‍या दिवशी ब्लॅक बॉक्स सापडला होता. आता कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) सापडला आहे.  या दुर्घटनेचा तपास नागरी हवाई सचिव समीर कुमार सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली विमान अपघात संस्थेकडून (एएआयबी) सुरू आहे. यापूर्वी, एएआयबीने फक्त फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) सापडला असल्याचे म्हटले होते.  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पी.के. मिश्रा यांनी रविवारी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर, जखमींची रुग्णालयात भेट घेतली. या भेटीनंतर उच्च स्तरीय अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत मदत आणि बचाव कार्य तसेच तपासाच्या प्रगतीसंदर्भात चर्चा झाली.  फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) सापडले असून ते सुरक्षित आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले. दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडल्याने अपघाताचे कारण शोधणे सोपे जाईल, असेही ते म्हणाले.
 

Related Articles