पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?   

राज यांचा सवाल

मुंबई, (प्रतिनिधी) : कुंडमळा दुर्घटनेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. ‘एक्स’ या समाज माध्यमावर त्यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 
 
हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली? हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, ’बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे...’

पावसाळ्याआधी तपासणी का नाही?

पण, मुळात हा प्रसंग का येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरते बोलायचे झाले तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असे काही नियोजन करता येत नाही? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचे नियोजन करून प्रशासनाकडून काम करून का घेता येत नाहीत? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग? असा सवाल राज यांनी केला आहे.
 

Related Articles