लाखणगाव घोडनदी पात्रावरील जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक   

नवीन पुलाचे काम अर्धवट

मंचर, (प्रतिनिधी) : बेल्हा-जेजुरी महामार्गावरील लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील जुना पुल वाहतुकीसाठी धोकादायक झाला असून त्याच्या शेजारीच नवीन पुलाचे चार वर्षापासून बांधकाम अर्धवट असून हे बांधकाम कधी पूर्ण होणार, असा सवाल वाहन चालकांसह ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट राहिलेले पुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
 
लाखणगाव येथून बेल्हा-जेजुरी महामार्ग जातो. महामार्ग सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. लाखनगाव या ठिकाणी घोडनदीवर १० कोटी रुपयांचा नवीन पूल मंजूर झाला आहे. काही अर्धवट पुलाचे काम ही झाले आहे. मात्र, काही वर्षापासून या पुलाचे काम रखडले आहे. 
 
अर्धवट असलेल्या या पुलामुळे लाखणगाव येथे जुन्या पुलावरून वाहतूक होत असते. जुना पूल कमी उंचीचा व कमी रुंदीचा आहे. एका बाजूला रस्त्याला वळण आहे. त्यामुळे येथे अपघात होत असतात. या अगोदर ही जुन्या पुलावर अनेकदा अपघात होऊन वाहतूक ठप्प झाली होती. तसेच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर जुन्या पुलावरून वरून पाणी जाते. त्यामुळे दुचाकी चालक व इतर वाहन चालकांना धोकादायक रित्या पुलावरून ये-जा करावी लागते. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व पुलावरून पाणी गेले व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहन चालकांनी या ठिकाणी प्रवास केला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने बंद असलेले पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी  माजी सरपंच दस्तगीर मुजावर यांनी केली.
 
लाखणगाव येथून बेल्हा-जेजुरी महामार्ग जात असल्यामुळे सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असते. लाखणगाव येथील घोडनदीवर जुना पूल आहे. परंतु त्या पुलाची उंची कमी आहे. पुलाच्या क्षमतेच्या तुलनेत पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ट्रक, हायवा, वाळू वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, अवजड वाहने सतत या पुलावरून ये-जा करत असतात, तसेच पावसाळ्यात घोडनदीला पूर आल्यास अनेकदा पुराचे पाणी पुलावरून जाते व पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे पुलाच्या आजूबाजूचा मातीचा भराव काही प्रमाणात वाहून गेला आहे. त्यामुळे भविष्यात जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता आहे.

सतीश रोडे पाटील, माजी उपसरपंच, लाखणगाव.

 

Related Articles