जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल २०२६ पासून   

नवी दिल्ली : देशात १६ वर्षांनंतर होणारी १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना २०२७ मध्ये दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा १ एप्रिल २०२६ पासून सुरू होईल. या टप्प्यात घरोघरी जाऊन यादी  केली जाईल. यामध्ये घराची स्थिती, सुविधा आणि मालकीची माहिती संकलित केली जाईल.दुसरा टप्पा १ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होईल, ज्यात देशभरातील लोकसंख्येची माहिती घेतली जाईल. या भव्य मोहिमेसाठी सुमारे ३४ लाख गणनाकर्मी व पर्यवेक्षक, तसेच १.३ लाख जनगणना अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. या वेळेस जातिनिहाय माहिती घेण्याचीही व्यवस्था असेल.विशेष म्हणजे, लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ही जनगणना १ ऑक्टोबर २०२६ पासून घेतली जाईल, तर उर्वरित भारतात ती २०२७ मध्ये पार पडेल.
 
भारताचे महा-पंजीकरण अधिकारी व जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी सांगितले की, केंद्र सरकारने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत की, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कोणतेही प्रशासकीय बदल पूर्ण करावेत. 

विचारले जाणारे प्रश्न

घरातील फोन, इंटरनेट, सायकल, दुचाकी, चारचाकी, टीव्ही, रेडिओ यांसारख्या वस्तूंच्या मालकीबाबत विचारणा, पिण्याच्या पाण्याचा स्रोत, विजेची सुविधा, शौचालय आणि त्याची उपलब्धता, आंघोळीची जागा, स्वयंपाकघर, इंधनाचा प्रकार, घराच्या फरशी, भिंती, छताची सामग्री, घरातील एकूण खोल्यांची संख्या, कुटुंबात विवाहित जोडपी आहेत का? घर स्त्रीच्या नावावर आहे का? असे प्रश्न नागरिकांना विचारले जातील. 

दुसर्‍या टप्प्यात वैयक्तिक माहिती 

दुसर्‍या टप्प्यातील जनगणनेत प्रत्येक व्यक्तीची आधारभूत माहिती, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि अन्य बाबतीतील माहिती संकलित केली जाईल. 
 

Related Articles