मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात   

मेट्रोच्या कामाचा बेस्ट प्रवाशांना फटका

मुंबई : गिरगावातील ठाकूरद्वार स्थानकजवळ सोमवारी सकाळी बेस्ट ची बस ठाकुरद्वार नाक्यावर येताच बस खालीची माती खचून ती पाच फूट खड्ड्यात पडली. बसमधून असंख्य प्रवासी प्रवास करत होते. ही बस भुलेश्वरच्या दिशेने जात होती. कंडक्टरने सावधगिरी बाळगून प्रवाशांना बस मधून खाली उतरवले. ज्या ठिकाणी बस खड्ड्यात पडली, त्या ठिकाणी गिरगाव मेट्रो स्थानकाचे काम सुरू आहे. ज्यावेळेस गिरगावात मेट्रोचे काम सुरू झाले होते त्यावेळेस जगन्नाथ शंकर शेठ मार्गावरती रस्ता खचून भला मोठा खड्डा पडला होता.
 
दरम्यान सोमवारी ही घटना घडल्यानंतर देखील या ठिकाणी कोणीच मदतीला आले नव्हते हे प्रत्यक्षदर्शी रमेश अहिरेकर यांनी मुंबई महापालिकेला मोबाईल वरून कळवून घटनेची माहिती दिल्याचे सांगितले. दरम्यान साडेतीन तासानंतर या बसला एका क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले. मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वायब्रेशन होऊन जमिनीखालची माती सरकली आहे. गेल्या सात वर्षापासून या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असून याबाबत पाहिजे तशी काळजी कंत्राटदाराने घेतलेली नाही तसेच ड्रेनेज लाईन तुटून खालच्या खाली पाणी वाहत असल्यामुळे जमीन खालीची माती विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ही घटना घडल्याचे शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख दिलीप नाईक यांनी म्हटले आहे.

Related Articles