मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ गाड्या भेसळयुक्त इंधनाने भरल्या   

रतलाम : मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या ताफ्यातील सुमारे १९ वाहने इंदौरवरून रतलामला जात असताना अचानक वाटेत थांबली.प्रादेशिक उद्योग परिषदेत सहभागी होण्यासाठी डॉ. मोहन यादव यांचा ताफा सर्व गाड्यांमध्ये डिझेल भरून पुढे सरकला. त्यानंतर काही वेळातच सर्व वाहने एक-एक करून थांबू लागली.मध्य प्रदेशातील या घटनेने प्रशासन आणि सामान्य नागरिकांनाही धक्का बसला आहे. 
 
घटनेचा तपासात सुरु असताना असे दिसून आले की सर्व वाहने रतलाममधील दोसीगाव येथील भारत पेट्रोलियमच्या शक्ती इंधन पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबली.संशय आल्यानंतर प्रशासन आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून चौकशी केली. वाहनांच्या टाक्या उघडल्यावर त्यामध्ये डिझेलसह मोठ्या प्रमाणात पाणी आढळून आले. २० लिटर डिझेलमधून १० लिटरपर्यंत पाणी बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करत प्रशासनाने पेट्रोल पंप सील केला.
 
पेट्रोल पंप व्यवस्थापकाने अलिकडेच झालेल्या पावसामुळे टाकीमध्ये पाणी शिरल्याचे निवेदन दिले आहे. तथापि, प्रशासन हे फक्त अपघात आहे की जाणूनबुजून भेसळ केली आहे याचा तपास करत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता अन्न आणि पुरवठा विभागाने पंप सील केला असून सविस्तर अहवाल तयार केला जात आहे.सुरुवातीला पाणी गळतीची शक्यता वाटत असली तरी चौकशी पूर्ण झाल्यानंतर सत्य बाहेर येईल असे मत नायब तहसीलदार आशिष उपाध्याय यांनी मांडले आहे. 
 
इंदौरहून नवीन वाहने मागवली
 
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी रात्री इंदौरहून नवीन वाहने मागवण्यात आली. परंतु या घटनेने प्रशासनाच्या तयारीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जर ही घटना सामान्य नागरिकासोबत घडली असती तर कदाचित इतक्या लवकर कारवाई झाली नसती. परंतु हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याशी संबंधित असल्याने अधिकाऱ्यांनी रात्री घटनास्थळी पोहोचून कडक कारवाई केली.
 
सामान्य जनतेला मिळणाऱ्या इंधनाची गुणवत्ता किती सुरक्षित आहे? जर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनेही भेसळयुक्त डिझेल टाळू शकली नाहीत तर सामान्य नागरिकांची स्थिती काय असेल? असे बरेच प्रश्न आता उपस्थित होत आहेत. 

Related Articles