शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले   

सांगली : गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. सोमवारी पहाटे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यास पावसाने झोडपून काढले. मिरज, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली, मात्र पावसाचे वातावरण राहिले.
 
रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पाऊस सुरु झाला. सोमवारी पहाटे पावसाचा जोर वाढला. जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. शिराळा तालुक्यातील चरण मंडलात अतिवृष्टी झाली. तेथे तब्बल ६५.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोकरूड, शिराळा, शिरसी, सागाव आणि मांगले परिसराला पावसाने झोडपले. पावसाचा जोर मोठा असल्याने ओढे, नाले ओसंडून वाहत होते. वाळवा तालुक्यातील कोरेगाव, कुरळप, तांदूळवाडी, पेठ, कासेगाव, आष्टा, कामेरी आणि चिकुर्डे पसिरात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
 
पलूस तालुक्यातील भिलवडी, नागठाणे, कुंडल, दुधोंडी, अंकलखोप परिसरात जोराचा पाऊस झाला. तासगाव तालुक्यातील मांजर्डे, विसापूर, सावळज, वायफळे या परिसरात पाऊस झाला. मिरज पश्चिम भागातही सोमवारी पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर पावसाने उघडीप घेतली होती, मात्र ढगाळ वातावरण होते.
 
सांगली शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. सकाळपासून पावसाच्या सरी बरसत राहिल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या, मात्र शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना पावसात भिजावे लागले.
 

Related Articles