मालमोटार बंद पडल्यामुळे बाह्यवळण मार्गावर कोंडी   

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे पूलाजवळ मालमोटार बंद पडल्यामुळे नवले पूलासह सिंहगड रस्त्यावर शुक्रवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकेच्या आवारातील बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमासाठी जाणारे राजकीय पक्षाचे पदाधिकार्‍यांसह वाहनचालक वाहतूक कोंडीत अडकले होते.
 
बाह्यवळण मार्गावरून मुंबईकडे निघालेली मालमोटार वारजे पुलाजवळ सकाळी बंद पडली. वाहनचालक, तसेच नागरिकांनी मालमोटार बाजूला हटवण्याचे प्रयत्न केले मात्र, मालमोटार हलवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. या घटनेनंतर बाह्यवळण मार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली. वारजे पुलापासून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. बाह्यवळण मार्गावरील नर्‍हे भागातील स्वामीनारायण मंदिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच, सिंहगड रस्त्यावरून वारजे पुलाकडे जाणारी वाहनेदेखील कोंडीत अडकली. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्यासह वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी, कर्मचारी वाहतूक नियोजनासाठी तैनात होते. वाहतूक कोंडीतून मार्ग काढल्यानंतर दोन क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला काढण्यात आला. त्यानंतर या भागातील वाहतूक पूर्ववत झाली. बाह्यवळण मार्गावरील नवले पूल, तसेच वारजे पुलावर अपघाताच्या घटना घडतात, तसेच वाहने बंद पडतात. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत होते.वारजे परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय आहे. या कार्यालयाजवळ दोन क्रेन तैनात ठेवण्यात याव्यात, असे पत्र वाहतूक पोलिसांनी यापूर्वी दिले होते. मात्र, अद्याप क्रेन आणलेल्या नाहीत, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

Related Articles