विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचावेत   

डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

पुणे : अनेकदा पारंपरिक शिक्षण हे रोजच्या जगण्यातील समस्यांना भिडण्यात अपूरे ठरते. त्यामुळे विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्‍यांच्या बांधा पर्यंत पोहोचल्यास शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न सुटतील. त्यातून शेती सुलभ आणि परवडणारी होईल, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला. 
 
मनोहर कोलते मैत्र संघ पुणे, तर्फे रविवारी आयोजित सत्कार सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सबनीस बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात महावितरण मुंबईच्या मानव संसाधन विभागाचे संचालक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल राजेंद्र पवार यांचा आणि शेती विकासासाठी आधुनिक यंत्रे निर्माण करुन शेतकर्‍यांना मदत करणारे तरुण संशोधक निरंजन तोरडमल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी वेदांत प्रकाशनातर्फे मनोहर कोलते लिखित आणि संकलित ‘मनोहारी विचार भाग ३’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 
 
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, सरहद्द, पुणेचे संस्थापक संजय नहार, ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. केशव देशमुख आणि मैत्र संघ, पुणेचे प्रमुख मनोहर कोलते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध सामाजिक संस्था आणि समाजोपयोगी काम करणार्‍या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच नवरत्न वृध्दाश्रम आणि स्नेहछाया बालकाश्रम यांना देणग्या देण्यात आल्या. 
 
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, मुल्याधिष्ठीत समाज निर्मितीसाठी मूल्यांवर विश्वास असणार्‍या पिढीची गरज आहे. राजकारण मूल्यहिन होत असताना मूल्यांचे संस्कार असलेली पिढीच समाजाचे नेतृत्व करू शकते.सचिन ईटकर म्हणाले, सध्या सगळीकडे भयावह परिस्थिती आहे. आशा-निराशेचा खेळ सुरू असून कोणत्याही क्षेत्रात उत्साहवर्धक काम होताना दिसून येत नाहीये. अशावेळी प्रशासनामध्ये आशावाद पेरणार्‍या लोकांची नेमणूक होणे, निश्चितच आवश्यक आहे. राजकारणी व्यक्ती केवळ एका निवडणुकीपुरता विचार करतात. तर नेतृत्व करणारे लोक एका पिढीचा विचार करतात. आपल्याला निवडणुकीपुरता विचार करणारे नेते नको असून पिढ्यांचा विचार करणारे नेतृत्व पाहिजे आहे. 
 
यावेळी बोलताना संजय नहार म्हणाले की, आग विध्वंसक असते आणि आग संहारक पण असते. आपण तिचा कशा पद्धतीने वापर करतो, हे त्या व्यक्तीच्या दृष्टीकोनावर अवलंबून असतो. आपण त्या आगीपासून कोणाचे घर पेटवतो की, पणती प्रज्वलीत करतो ती कृती अधिक महत्त्वाची असते. यावेळी शेती विकासासाठी आधुनिक यंत्रे निर्माण करुन शेतकर्‍यांना मदत करणारे तरुण संशोधक निरंजन तोरडमल आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. केशव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर कोलते मैत्र संघ पुणे,चे प्रमुख मनोहर कोलते यांनी केले. भागवत थेटे यांनी सूत्रसंचलत केले. शैलेंद्र भालेराव यांनी आभार मानले.

Related Articles