भीमाशंकरला दर्शनासाठी ऑनलाईन नावनोंदणी   

१५ ते २० मिनिटांत मिळणार दर्शन

भीमाशंकर, (वार्ताहर) : बारा ज्योतिर्लिंगापैकी पुणे जिल्ह्यातील एकमेव असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देशभरातून दररोज हजारो भाविक येथे येतात. मात्र, भाविकांना अनेक तास दर्शन रांगेत उभे राहावे लागते. वाहनतळासह अन्य सुविधांचा अभाव, बेकायदा व्यवसाय आणि गुन्हेगारी या समस्यांनी त्यांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यापासून भीमाशंकर येथे ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी केल्यास भाविकांना श्री क्षेत्र शिर्डीप्रमाणे १५-२० मिनिटांत दर्शन मिळणार असल्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
 
जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे कुंभमेळ्यानिमित्त भीमाशंकर परिसर विकासासाठी मंजूर २८८ कोटी रुपये निधी कामांच्या आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. नागनाथ यमपल्ले, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे आदी उपस्थित होते.
 
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे बेकायदा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. गुन्हेगार खुलेआम देशी कट्ट्यांसह फिरत आहेत. त्यामुळे देवस्थानची बदनामी होत आहे. पोलिस यंत्रणेने तातडीने कठोर पावले उचलावीत, अन्यथा मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लक्ष वेधावे लागेल, असे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
 
प्रशासन व देवस्थान ट्रस्ट दर १५ दिवसांनी संयुक्त बैठक घेतील. भाविकांसाठी सेवा सुधारण्याचे काम गतीने पार पाडतील. यासाठी आरोग्य सुविधा, औषधांचा साठा, सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
 

Related Articles