टाळ मृदुंगा संगे रंगला अश्व रिंगण सोहळा   

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकी मुक्कामी   

सोमनाथ कवडे 

बारामती : टाळ मृदुंगांच्या गजरात, ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात आणि वारकरी भक्तांच्या भक्तिमय प्रसन्न वातावरणात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मानाचे पहिले गोल अश्व रिंगण सोहळा बेलवाडी (ता. इंदापूर) येथे उत्साही आणि भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात संपन्न झाला.
 
संसर (ता. इंदापूर) येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा शनिवारी सकाळी सात वाजता निमगाव केतकीकडे मार्गस्थ होत असतानाच, बेलवाडी (ता. इंदापुर) येथील पटांगणावर मानाच्या रिंगणासाठी पालखीचे थाटात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत, मोठ्या जयजयकारात पालखीचे स्वागत केले. पालखीचे आगमन होतात टाळ मृदुंगांच्या गजरात, ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात तल्लीन झालेला भक्ती सागर लोटला होता. 
 
रिंगणाच्या सुरुवातीला क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व तहसीलदार जीवन बनसोडे यांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर दिंड्यांच्या रांगा, टाळ मृदंगांचा गजर, भगव्या पताका फडकावत वारकरी, डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला वारकरी यांची नयनरम्य प्रदक्षिणा झाली. 
 
यानंतर मोहिते पाटलांचे मानाचे अश्व रिंगण स्थळी दाखल झाले. क्रीडामंत्री भरणे यांच्या हस्ते मानाच्या अश्वांचे पूजन झाल्यानंतर, त्या अश्वांनी ज्ञानोबा-तुकारामांच्या गगनभेदी घोषणा सुरू असतानाच डोळ्याचे पाते लावतेना लावते तोच अश्वाने पालखीला तीन प्रदक्षिणा घालून पूर्ण केल्या. हा नयन रम्य सोहळा काही क्षणात संपन्न झाला अश्व रिंगण संपताच भाविकांनी अश्वाच्या चरणधुळीसाठी एकच गर्दी केली. हे दृश्य डोळ्यात साठवताना अनेकांच्या डोळ्यांत श्रद्धेचे अश्रू दाटले होते. हा नेत्रदीपक अश्व रिंगण सोहळा भाविकांच्या मनात ठसा उमटवणारा ठरला.

Related Articles