सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात   

पुणे : जय भवानी, जय शिवराय.. छत्रपती संभाजी महाराज की जय.. असा अखंड जयघोष..शंख, हलगी आणि पारंपरिक वाद्यांचा गजर..भंडारा व फुलांची उधळण.. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर झालेली पुष्पवृष्टी..अशा शिवमय वातावरणात सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पालखी सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. 
 
विश्व हिंदू परिषद व शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समितीतर्फे (किल्ले सिंहगड) तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून दुचाकी फेरी काढून झाला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शिल्पाचे पूजन झाले. याप्रसंगी सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उपाध्यक्ष शरद जगताप, विभाग मंत्री केतन घोडके, धनंजय गायकवाड यांसह शिवभक्त उपस्थित होते. अभिवादन सोहळ्याचे यंदाचे हे आठवे वर्ष होते. 
 
ही फेरी वीर बाजी पासलकर स्मारकपासून ते विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा या मार्गाने सिंहगडावरील वाहनतळ येथे मार्गस्थ झाली. त्यानंतर सिंहगडावरील वाहनतळापासून ते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हलगी पथक, केशव शंखनाद पथक, ढोल ताशा पथक आदी सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आले. तसेच, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन आणि सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील करण्यात आले.  
 
छत्रपती शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्याकरिता सर्व शिवभक्तांना राजगडावर उपस्थित राहता येते असे नाही. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक गड-किल्ल्यावर हा सोहळा साजरा व्हायला हवा. हिंदू साम्राज्य दिन म्हणून हा दिवस साजरा केला जात आहे. स्वराज्य हे आपल्या सगळ्यांचे राज्य आहे. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हा सोहळा साजरा होत असून ही कौस्तुकास्पद गोष्ट आहे. गडावर केवळ सोहळा साजरा न करता गड स्वच्छता आणि वृक्षारोपणासारखे सामाजिक उपक्रम होतात, ही चांगली बाब आहे. 

Related Articles