पर्यावरण संवर्धनाचा जागर   

सातशेहून अधिक पर्यावरणदूतांचा सहभाग

पुणे : तेर पॉलिसी सेंटरच्या वतीने आयोजित ‘तेर एन्व्हायरॉथॉन- रन फॉर एन्व्हायर्नमेंट’ या पर्यावरण संवर्धनासाठीच्या विशेष उपक्रमाला रविवारी पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहाटे ४.३० वाजता पुणे ग्रामीण पोलीस हॉकी ग्राउंड (पाषाण) येथून या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत ७०० हून अधिक पर्यावरणदूत आणि नागरिक सहभागी झाले होते. स्पर्धा ही केवळ धावण्याची स्पर्धा न राहता पर्यावरणाविषयी जागर आणि प्रत्यक्ष कृती करण्याचा संकल्प ठरली. स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येक सहभागीमागे एक झाड लावण्याचा संकल्प तेर पॉलिसी सेंटरने केला, हे या उपक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.
 
स्पर्धा तीन, पाच आणि दहा किलोमीटर अशा तीन गटांमध्ये पार पडली. १२ ते १८, १९ ते ४०, ४१ ते ५५ आणि ५६ वर्षांवरील अशा वयोगटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. १० कि.मी. गटासाठी रोख पारितोषिके, तर इतर गटांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती. अनेक नामवंत कंपन्यांचे गट यामध्ये सहभागी झाले.कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी टाटा ब्लू स्कोप चे अजय रतन, गुगल कंपनीचे विजय कुमार, पाहुणे म्हणून उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभासाठी निवृत्त ज्येष्ठ पोलिस अधिकारी मधुकर झेंडे, पर्यावरणासाठी भारतभर धाव घेणारे आणि श्रीनगर ते खारडुंगला ही पर्यावरण दौड पार पाडणारे कर्नल भूपेंद्र सुब्बू, बसंत प्रधान, अनुप बनिया, लव बर्मन या चार पर्यावरणप्रेमींनी उपस्थित राहून उपस्थितांना प्रेरणा दिली. प्रिया जैन-बीडकर यांनी सूत्रसंचालन केले.
 
तेर पॉलिसी सेंटरच्या स्थापनेला १५ वर्षे पूर्ण होत असल्याने संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘टाटा ब्लू स्कोप स्टील’च्या सहकार्याने पार पडलेली ‘एन्व्हायरॉथॉन’ ही या उपक्रमांची सुरुवात ठरली.संस्थेच्या संस्थापक डॉ. विनिता आपटे म्हणाल्या, एन्व्हायरॉथॉन ही केवळ स्पर्धा नाही, तर एका मोठ्या सामाजिक आणि पर्यावरणीय चळवळीची पायाभरणी आहे.

Related Articles