बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार   

पुणे : सध्याची तरुणपिढी ही बुद्धिमान असून त्यांच्या मध्ये चांगली प्रयोगशीलता आहे. त्यामुळे भविष्यात देशात रामराज्य येण्यास वेळ लागणार नाही, असे मत संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. आरती दातार यांनी व्यक्त केले. हिंदू महिला सभेच्या वतीने ऐतिहासिक रामायण-बालकांड कार्यक्रमाचे एस. एम. जोशी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असताना डॉ. दातार बोलत होत्या.
 
टीम इतिहास यांच्यातर्फे ’ऐतिहासिक रामायण-बालकांड’ या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. आयटी अभियंता म्हणून काम करणारे आदित्य गोखले आणि आर्यमन लिमये या दोघांनी संशोधन करून या कार्यक्रमाचे लिखाण केले आहे. रामजन्म ते सीता स्वयंवरापर्यंतचा प्रवास त्यांनी सांगीतिक माध्यमातून सादर केला आहे. वैज्ञानिक-सांस्कृतिक अशा दृष्टीकोनातून त्यांनी केलेल्या विवेचनाने कार्यक्रमाची शोभा वाढविली. रामायणातील बालकांडामध्ये असणारा इतिहास, भूगोल, अध्यात्म, मानसशास्त्र या तरुणांनी पिंजून काढले असल्याने या कार्यक्रमाची उंची वाढली असल्याचे डॉ. दातार यावेळी म्हणाल्या.
 
महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणाचा अभ्यास करून लिखाण करताना यज्ञ परंपरा काय आहे? गंगेचा उगम कुठून झाला? अहल्येची गोष्ट अशा गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या आहेत. आपल्या लिखाणाला विज्ञानाची जोड देताना या तरुणांनी वाल्मिकी रामायण पिंजून काढले आहे, त्यामुळे हा कार्यक्रम पाहताना तो प्रत्येकाला भावतो. आयटीमधील मुले कामामध्ये खूप व्यस्त असतात.  मात्र, या दोघांनी वेळ काढून आपल्या आवडीच्या विषयावर संशोधन करून केलेले हे काम वाखाणण्याजोगे असल्याचे डॉ. दातार यावेळी म्हणाल्या.
 
सगळ्या कथांमध्ये रामकथा सर्वश्रेष्ठ आहे, त्यामुळे ती कथा जगभरात सातासमुद्रापार पोहचवण्याची आवश्यकता आहे. या ऐतिहासिक रामायण- बालकांड मधून त्याची पूर्तता होईल, अशी अपेक्षा असल्याचे डॉ. दातार यांनी नमूद केले. तरुण पिढी खूप कल्पक आणि हुशार असल्यामुळे त्यांचे नवनवीन प्रयोग यशस्वी होतात, त्यामुळे आपल्याकडे रामराज्य येण्यास फार वेळ लागणार नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमात प्रणव बापट, सानिका पिंगळे, अथर्व कदम यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुप्रिया दामले यांनी केले. वंदना जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Related Articles