बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या सादरीकरणाला पसंती   

पुणे: शास्त्रीय परिभाषेत आणि पारिभाषिक संज्ञांमध्ये अडकलेले वन्यजीव, झाडे, वेली, माती, पाणी... शनिवारी सायंकाळी छोट्या दोस्तांसाठी गोष्टीरूप धारण करून आले, आणि पोरांसह थोरांनाही या गोष्टींनी गुंतवून ठेवले. मग ती घुबडाची सर्वांगीण माहिती असो, पपेट शो च्या माध्यमातून निसर्गाचे महत्त्व समजून घेणे असो, बांधवगडच्या जंगलातील रेस्क्यू ऑपरेशन्स असोत किंवा ताडोबाच्या बर्डमॅनकडून अनुभवलेली पशुपक्ष्यांच्या आवाजांची अद्भुत दुनिया असो...सारेच या अनुभवांचा एक भाग होऊन गेले.
 
निमित्त होते, ’वाईल्डलाईफ फेस्टिवल फॉर किड्स’ चे. झपाट्याने कमी होत असलेल्या जंगलांचे व वन्यप्राणी संवर्धनाचे महत्व मुलांना योग्य वेळी कळावे, यादृष्टीने ’जंगल बेल्स’, ’नेचर वॉक चॅरीटेबल ट्रस्ट’ व ’बोगनवेल फार्म्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाईल्डलाईफ फेस्टिवल फॉर किड्स’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास पुणे वन विभागाचे सहकार्य लाभले होते. या उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष होते. हा एक दिवसीय महोत्सव दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावर असलेल्या बोगनवेल फार्म्स येथे झाला. कार्यक्रमास सर्वांना विनामूल्य प्रवेश होता.कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण व कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी तसेच संजीवनी डेव्हलपर्सचे संजय देशपांडे, मंजुश्री खर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
 
जंगल बेल्स’ च्या हेमांगी वर्तक म्हणाल्या, ’भावी पिढीमध्ये पर्यावरणाची आस्था, निसर्ग प्रेम यांच्याविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी हा एक दिवसाचा किड्स फेस्टिवल’ आयोजित केला आहे,’.संजय देशपांडे यांनी पालकांमध्ये जाणीवजागृती होणे अगत्याचे आहे,’ असे मत मांडले. ’किड्स फेस्टिवल ’ चा हा उपक्रम अभिनंदनीय आहे आणि तो सुरू राहावा,’ अशा शब्दांत पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एन.आर.प्रवीण यांनी उपक्रमाचे कौतुक केले. सुयश टिळक यांनीही उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. फेस्टिवलची सुरवात घुबडतज्ञ डॉ. प्राची मेहता यांच्या घुबडांवरील सर्वांगीण माहिती देणार्‍या सादरीकरणाने झाली.  कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात अद्वैत दिंडोरे निर्मित ’इंडियन वुल्फज’ या लघुपटाचे प्रदर्शन झाले. ’नेचर वॉक’ घ्या अनुज खरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

Related Articles