घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे   

कौटुंबिक न्यायालयाचा आदेश 

पुणे : तेरा वर्षाच्या सुखी संसारात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे दोघांनी  एकमेकांच्या संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कौटुंबिक न्यायालयाने या दाम्पत्याच्या परस्पर संमतीने दाखल केलेल्या घटस्फोट अर्जास तत्काळ मंजुरी दिली. विशेष म्हणजे, मुलांच्या भवितव्याच्या विचार करून न्यायालयाने मुलांचा ताबा वडिलांकडे सोपविण्याचे आदेश दिले. 
 
राकेश आणि पुजा (नावे बदललेली) यांचा विवाह वर्ष २०१० मध्ये झाला होता. लग्नानंतर त्यांचा संसार काही वर्ष त्यांच्यामध्ये सुरळीत सुरू होता. या काळात त्यांना दोन अपत्ये झाली. त्यानंतर दोघांमध्ये मतभेद वाढत गेले. संवाद कमी होत गेला. कुरबुरी वाढत होत्या. अखेर वाद वाढत गेल्याने डिसेंबर २०२३ पासून त्यांनी वेगळे राहण्यास सुरुवात केली. तरीही त्यांच्यातील मतभेद दूर झाले नाहीत. त्यामुळे त्यांनी समुपदेशन आणि परस्पर सल्ल्याने कायदेशीररीत्या घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हिंदू विवाह अधिनियम, १९५५ अंतर्गत कलम १३(ब) अन्वये परस्पर संमतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत त्यांचा घटस्फोट मंजूर केला. पतीच्या वतीने वकील गायत्री कांबळे यांनी बाजू मांडली. 
 
सद्य:स्थितीत परस्पर संमतीने होणार्‍या घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी समाजात घटस्फोट हा कलंक समजला जात होता. परंतू, आता व्यक्ती स्वातंत्र्य, मानसिक आरोग्य आणि परिपक्वतामुळे विभक्त होण्याची निवड केली जाते. नात्यांचा अनादर न करता, परस्पर सन्मान राखून घेतलेला घटस्फोट ही एक जबाबदारीची आणि सजग भूमिका असते.
 
गायत्री कांबळे, पत्नीच्या वकील 

Related Articles