नायजेरियात १०० नागरिकांना खोल्यांमध्ये कोंडून जिवंत जाळले   

अबुजा : नायजेरियातील सेंट्रल बेन्यू राज्यातील येलेवाटा गावात काही बंदूकधार्‍यांनी जवळपास शंभर नागरिकांना खोल्यांमध्ये कोंडून जिवंत जाळले. काही नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल नायजेरियाने ही माहिती दिली.
 
नायजेरियाचे बेन्यू राज्य देशाच्या मध्यभागी आहे. त्याच्या उत्तरेला मुस्लिम बहुल आणि दक्षिणेला ख्रिश्चन पट्टा आहे. हिरवीगार जमीन शोधणार्‍या गुराखी आणि जमीन कसणार्‍या शेतकर्‍यांमध्ये या प्रदेशात बर्‍याच काळापासून हिंसाचार सुरू आहे. जमिनीच्या वादांमुळे अनेकदा वांशिक आणि धार्मिक तणाव वाढतो आणि गटांमध्ये भयानक हिंसाचार होतो. शनिवारी काही बंदुकधार्‍यांनी येलेवाटा गावातील जवळपास शंभर नागरिकांना त्यांच्या खोल्यांमध्ये कोंडून जिवंत जाळले. 
 
त्यामुळे संपूर्ण गावाचे एका उघड्या स्मशानात रूपांतरित झाले. मृतदेह सर्वत्र विखुरलेले होते. काही जण गोळी लागल्याने वेदनेने तडफडत आहेत. त्यांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. उपचारांसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. 
 
येलावतमधील या भयानक हल्ल्यानंतर अनेक लोक बेपत्ता आहेत. अलिकडच्या काळात बेन्यू राज्यात अशा हत्याकांडाच्या घटना वारंवार घडत आहेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन दोन्ही लोकसंख्या असलेल्या नायजेरियामध्ये वाढत्या हल्ल्यांबद्दल अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने चिंता व्यक्त केली आहे. ही अत्याचाराची परिसीमा आहे. बेन्यू राज्यात होणार्‍या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याचे आम्ही नोंदवत आहोत, जिथे बंदूकधारी नागरिक निर्भयपणे लोकांना मारत आहेत. या हिंसाचाराचा अन्न सुरक्षेवरही परिणाम होत आहे, कारण बहुतेक बळी शेतकरी आहेत.

सरकारचे प्रयत्न निष्प्रभ

गेल्या महिन्यातही या प्रदेशातील ग्वेर पश्चिम जिल्ह्यात संशयित मेंढपाळांनी किमान ४२ नागरिकांची हत्या केली होती. एसबीएम इंटेलिजेंसच्या मते, २०१९ पासून अशा संघर्षांमध्ये ५०० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत आणि जवळपास २२ लाख लोकांना त्यांचे घर सोडून जावे लागले आहे. नायजेरियन सरकारने बेन्यू राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले; परंतु त्यांना फारसे यश आले नाही.
 
बेन्यू राज्यातील हिंसाचार थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलावी. पीडितांना न्याय आणि पुरेशी भरपाई मिळावी, अशी मागणी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने नायजेरियन सरकारकडे केली आहे.
 

Related Articles