सूर्यकुमार यादववर तिसरी शस्त्रक्रिया   

मुंबई : भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यावर जर्मनीतील म्युनिक येथील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 34 वर्षीय स्टार बॅटरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दुखापतीतून सावरत असल्याची माहिती दिली आहे. या शस्त्रक्रियेनंतर पुढच्या दोन आठवड्यांत तो बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे.
 
मुंबईकर क्रिकेटर सूर्यकुमार यादवनं इन्स्टाग्राम अकाउंटवरुन जी पोस्ट शेअर केलीये, त्यात तो रुग्णालयातील बेडवर झोपल्याचे दिसून येते. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय की, उजव्या पोटाच्या खालच्या भागात झालेल्या स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया अगदी यशस्वी पार पडली. यातून सावरत असून लवकरच कमबॅक करेन, असा उल्लेख सूर्यकुमार यादवनं आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
 
स्पोर्ट्स हार्निया  या वैद्यकिय भाषेत ऍथलेटिक पबल्गिया असे संबोधले जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे  स्पोर्ट्स हार्निया आणि हार्निया या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. स्पोर्ट्स हार्नियामध्ये मांसपेशी किंवा टिश्यू फाटणे यासारख्या समस्येचा सामना करावा लागतो. कंबरखालचा भाग किंवा खालच्या पोटाच्या भागातील स्नायूंमध्ये ही समस्या उद्भवू शकते. 2023 मध्ये घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर 2024 मध्ये सूर्यकुमार यादव याच्यावर अशाच प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  आता तीन वर्षांतील त्याच्यावरील तिसरी शस्त्रक्रिया आहे.
 
सूर्यकुमार यादवनं आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एकदम खास छाप सोडली होती. आयपीएलमधील सलग 16 सामन्यात प्रत्येक वेळी 25 पेक्षा अधिक धावा करत त्याने नवा वर्ल्ड रेकॉर्डही सेट केलाय. आयपीएलनंतर टी-20 मुंबई लीग स्पर्धेतही त्याची झलक पाहायला मिळाली होती.  भारतीय संघ सध्या इंग्लंड दौर्‍यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्यग्र आहे. 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान भारत-इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या दौर्‍यानंतर भारतीय संघ 17 ऑगस्टपासून बांगलादेश दौर्‍यावर वनडे आणि टी-2- मालिका खेळणार आहे. तोपर्यंत सूर्या रिकव्हर होईल, अशी अपेक्षा आहे.

Related Articles