स्वस्त तांबे विक्रीच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणूक   

पुणे : स्वस्त दरात तांबे विक्री करण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची ४८ लाख ७२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, पर्वती पोलिस ठाण्यात व्यावसायिकाने (रा. पर्वती) दिलेल्या तक्रारीवरून सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
 
तक्रारदार यांनी एप्रिल महिन्यात एका संकेतस्थळावर स्वस्तात दक्षिण आफ्रिकेतून तांबे मिळवून देऊ, असा संदेश पाहिला होता. या संदेशात संपर्क क्रमांक देण्यात आला होता. त्यानंतर, तक्रारदार यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर, व्यावसायिकाला २५ टन तांबे (कॉपर स्क्रॅप) देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी जाळ्यात ओढले. व्यावसायिकाला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. मे महिन्यापर्यंत व्यावसायिकाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात ४८ लाख ७२ हजार रुपये जमा केले.
 
सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर जहाजाने तांबे पाठवित असल्याचे सांगितले होते. प्रवास खर्चाची बनावट बिले सायबर चोरट्यांनी त्याला पाठविली. जहाजाद्वारे पाठविण्यात येणारा माल न पोहचल्याने व्यावसायिक तरुणाने सायबर चोरट्यांच्य मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करत आहेत.

Related Articles