बेकायदा वास्तव करणार्‍या चार बांगलादेशी नागरिकांना पकडले   

पुणे : बेकायदा घुसखोरी करून पुण्यात वास्तव्य करणार्‍या चार बांगलादेशी घुसखोरांना कोंढवा परिसरातून ताब्यात घेतले. लष्कराचा गुप्तचर विभाग आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्तपणे हि कारवाई केली. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एका नियोजित गृहप्रकल्पाच्या ठिकाणी चौघेजण मजुरी करून आपली गुजराण करत होते. त्यांनी भारतात कसा प्रवेश केला? त्यांच्यासोबत आणखी कोणी आहे का? याचा तपास केला जात आहे.
 
स्वपन निधुभूषण मंडल (वय ३९), मिथुनकुमार दिलीप मंडल (वय ३१), रणधीरकुमार मंडल (वय ३७) आणि दिलीप निमाई मंडल (वय ३८, सर्व सध्या रा. केईसी कामगार वसाहत, मूळ रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस हवालदार तानाजी चंद्रसेन सरडे यांनी याप्रकऱणी  कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
 
कोंढव्यात चार बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर याबाबतची माहिती कोंढवा पोलिसांना कळविण्यात आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे ओळखपत्र किंवा कागदपत्रे सापडली नाहीत. चौकशीत चौघांनी बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. चौघेजण मागील तीन ते चार महिन्यांपासून वास्तव्य करत असल्याची मााहिती तपासात मिळाली आहे.
 
चौघांनीही चार महिन्यांपूर्वी बांगलादेश सीमेवरून घुसखोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चार मोबाइल आणि सिमकार्ड जप्त केले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles