मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर   

पिंपरी : श्वानप्रेमातून माणसांची बिस्किटे भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणार्‍या नागरिकांच्या कृतीचा विपरित परिणाम आता त्यांच्या आरोग्यावर दिसू लागला आहे. मैद्याची बिस्किटे खाल्ल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भटक्या कुत्र्यांमध्ये केसगळती, जखमा व कृमींचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे भूतदयेचा अतिरेक शेवटी या मुक्या प्राण्यांच्या जीवावरच बेततोय.
 
शहरातील रस्त्यावर मुक्तपणे फिरणार्‍या भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालणार्‍यांची संख्या वाढत चालली असली, तरी त्यांच्या या प्रेमळ वाटणार्‍या कृतीचा घातक परिणाम आता स्पष्ट दिसू लागला आहे. विशेषतः माणसांच्या आहारासाठी तयार केलेली मैद्याची आणि साखरयुक्त बिस्किटे ही कुत्र्यांसाठी अत्यंत अपायकारक ठरत आहेत. या बिस्किटांमध्ये असणारा ग्लुटेन नावाचा घटक कुत्र्यांच्या त्वचेसाठी धोकादायक ठरतो. त्यामुळे त्यांच्या अंगावरील केस गळतात आणि पुढे त्याच ठिकाणी खाज, जखमा आणि संसर्ग होतो. या व्याधीस अलोपेशिया म्हणतात आणि सध्या पिंपरी चिंचवड शहरात अशा आजारी कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
 
इतकेच नव्हे, तर बिस्किटातील गोडीमुळे कुत्र्यांच्या शरीरात जंत व कृमींचाही प्रादुर्भाव होतो. त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढून चरबी साचते आणि पचनसंस्थाही बिघडते. भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक गंभीर ठरत आहे कारण त्यांच्यावर वैद्यकीय उपचारांची हमी नसते. शहरातील श्वानप्रेमींनी भावनिक भूतदया करताना भटक्या प्राण्यांच्या आरोग्याचा विचार करणे गरजेचे आहे. चांगल्या उद्देशातून घातक परिणाम टाळण्यासाठी कुत्र्यांना योग्य आहार देणं हीच खरी सेवा ठरेल.
 
कुत्र्यांना आपण खात असलेली बिस्किटे देणे हे त्यांच्या आरोग्यास अत्यंत अपायकारक आहे. अनेकदा भटक्या कुत्र्यांच्या अंगावर केस गळाल्याचे, फडके पडल्याचे प्रकार आपण पाहतो. त्यामागे याच कृती असतात. त्यांना चपाती, भात, भाकरी यासारखे सहज पचणारे अन्न द्यावे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Related Articles