पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे   

शरद पवार आणि अजित पवार करणार मार्गदर्शन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार व शरद पवार हे दोन्ही पक्ष सक्रिय झाले आहेत. त्यादृष्टीने उद्या मंगळवारी शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार यांचे स्वतंत्र मेळावे होणार आहेत. काका व पुतणे काय बोलणार याची उत्सकुता निर्माण झाली आहे.
 
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे कामकाज सुरू झाले आहे. दिवाळीच्या धामधुमीत निवडणुकीचा बार उडणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. माजी नगरसेवक व इच्छुक पुन्हा सक्रिय झाले आहेत. फेब्रुवारी २०१७ला राष्ट्रवादी काँग्रेसची गेलेली सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरसावले आहेत. त्यादृष्टीने स्थानिक पदाधिकारीही कामाला लागले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेलेले स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक पुन्हा स्वगृही परतत आहेत.
 
त्यासाठी अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या मंगळवारी भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. त्यात अजित पवार काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा त्याच दिवशी ताथवडे येथील एका हॉटेलमध्ये आयोजित केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टीचे पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्या मेळाव्यात पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित राहणार आहेत.
 
एकाच दिवशी शहरात काका व पुतने यांचे स्वतंत्र मेळावे होणार आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाकडे किती ताकद आहे, हे ही स्पष्ट होणार आहे. दोन्ही पक्षांनी महापालिका निडणुकीसाठी कंबर कसली आहे. निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे दोन्ही पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
निवडणुकीत तरुणांना संधी देणार
 
राष्ट्रीय नेते शरद पवार हे मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहेत. ते ताथवडे येथील मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्या मेळाव्यात मनसे व आपचे कार्यकर्ते पक्षात प्रवेश करणार आहेत. महापालिका निवडणुकीत अधिकाधिक तरुणांना संधी देण्याचे वरिष्ठ नेत्यांचे नियोजन आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.
 
अजितदादांच्या नेतृत्वाखाली लढणार
 
पक्षाचे सर्वेसर्वा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा कार्यकर्ता मेळावा भोसरी येथे मंगळवारी आयोजित केला आहे. त्यात शहरातील पदाधिकारी व माजी नगरसेवक पक्षात प्रवेश करणार आहेत. आमचे जुने सहकारी घरवापसी करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी अजितदादा मार्गदर्शन करणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.

Related Articles