वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक   

वडगाव मावळ, (वार्ताहर) : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रभाग रचना निश्चित करण्याचे आदेश दिल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने त्याची तयारी सुरू केली आहे. येत्या १७ जूनपासून प्रारूप प्रभाग रचना प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
 
राज्य शासनाच्या निर्देशानुसार वडगाव नगरपंचायतीत एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार असून १७ प्रभागांसाठी १७ सदस्यांची निवड होणार आहे. प्रत्येक प्रभागातून एक सदस्य निवडला जाईल. नगराध्यक्ष पदासाठी मात्र थेट जनतेतून निवड होणार आहे. प्रस्तावित प्रभाग रचना व आरक्षणामध्ये काही बदल होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
राज्य शासनाने नगरपंचायतींना प्रभाग रचनेसाठी जनगणना निकष निश्चित करून आदेश दिले. त्यानंतर वडगाव नगरपंचायत सज्ज झाली असून बैठकीद्वारे निवडणूक प्रक्रियेची आखणी सुरू झाली आहे. २०१८ मध्ये वडगाव नगर पंचायतीची स्थापना होऊन पहिल्यांदा निवडणूक पार पडली. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये वडगाव नगरपंचायतीची मुदत संपली होती. मात्र विविध कारणांमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. यामुळे आता तब्बल सात वर्षांनंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. तसेच पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम म्हणाले, राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत अधिकारी मसुद्याला मंजुरी देतील. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी होऊन त्यानुसार अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल आणि ती निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल.
 
प्रभाग रचना प्रक्रियेचा कालावधी
 
* ११ ते १६ जून : प्रगणक गटांची आखणी, प्रारूप प्रभाग रचना करणे
* १७ व १८ जून : जनगणनेच्या माहितीची पडताळणी करणे
* १९ ते २३ जून : संबंधित क्षेत्रांची स्थळ पाहणी करणे
* २४ ते ३० जून : गुगल मॅपवर प्रभाग नकाशे तयार करणे
* १ ते ३ जुलै : नकाशावर निश्चित केलेल्या क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी
* ४ ते ७ जुलै : प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीची स्वाक्षरी
* ८ ते १० जुलै : मसुदा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे

Related Articles