इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)   

इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केला आणि आधीच अशांत असलेला पश्चिम आशिया आणखी अशांत बनला. इराणची अणु वीज केंद्रे आणि हवाई तळ यांना इस्रायलने या वेळी लक्ष्य केले आहे. एवढेच नव्हे, तर इराणचे लष्कर प्रमुख, काही वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि अणु ऊर्जेशी संबंधित शास्त्रज्ञ यांनाही इस्रायलने ठार केले आहे. इराणनेही लगेचच इस्रायलवर ड्रोनद्वारे प्रतिहल्ले केले; पण ते परतवून लावल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. ‘रायजिंग लायन’ असे सांकेतिक नाव असलेली ही कारवाई बराच काळ आधी योजना आखून पार पाडली आहे हे या हल्ल्यास मिळालेल्या यशावरून दिसते. अणुबॉम्ब बनवण्यापासून इराणला रोखणे हा या कारवाईचा हेतू असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. या हल्ल्याशी आपला काही संबंध नसल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे; पण अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यास ‘उत्कृष्ट’ असे म्हटले आहे. अमेरिकेच्या धोरणातील विरोधाभास त्यातून दिसतो. इराणची राजवट बदलेपर्यंत आणि त्यांचा अणुकार्यक्रम पूर्ण बंद होईपर्यंत ऑपरेशन रायजिंग लायन चालू राहील, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. इराणचे सर्वेसर्वा आयतुल्ला खामेनी यांनी उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, याचा अर्थ हा संघर्ष बराच काळ चालणार असे दिसते.
 
क्षेपणास्त्रे विकसित
 
इस्रायल आणि इराण यांच्या सध्याच्या संबंधांचे वर्णन ‘हाड वैरी’ याच शब्दात करता येईल. इराणमध्ये महमद रेझा पेहेलवी या राजाची राजवट होती, तोपर्यंत दोन्ही देशांचे संबंध काही प्रमाणात मैत्रीचे होते. १९७९ मध्ये इराणच्या या ‘शाहा’ची किंवा राजाची सत्ता उलथवण्यात आली व इराण इस्लामी राष्ट्र बनले, तेव्हापासून इस्रायल व इराणचे संबंध बिघडले. अर्थात पूर्वीही पॅलेस्टाईनचे विभाजन करून इस्रायलची निर्मिती करण्यास, त्या देशाला राष्ट्रसंघात प्रवेश देण्यास इराणने विरोध केला होता. तरीही १९८० मध्ये इराण-इराक युद्धाच्या काळात इस्रायलने इराणला शस्त्रे विकून अब्जावधी डॉलर्स कमावले होते; मात्र इराणने आण्विक कार्यक्रम सुरु केल्यापासून दोन्ही देशांतील संबंध अधिक बिघडले. अण्वस्त्र प्रसार बंदी करार या आंतरराष्ट्रीय करारानुसार अनेक देशांनी इराणवर निर्बंध जाहीर केले होते. तरीही जगाचा विरोध न जुमानता इराणने युरेनियम समृद्ध करणे सुरु ठेवले. मध्यंतरीच्या काळात इराणने काही क्षेपणास्त्रेही विकसित केली. हा देश अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळ पोचला आहे हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. ट्रम्प यांनी नुकताच इराणला अणु कार्यक्रमाविषयी समझोता करण्याचा देकार दिला होता. गेल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा आयोगाची बैठक झाली. जगातील आण्विक घडामोडींवर लक्ष ठेवणारी ही राष्ट्र संघाची एक संस्था आहे. अण्वस्त्र प्रसार बंदी करारातील नियमांचे उल्लंघन करत असल्याबद्दल इराणवर ताशेरे ओढणारा ठराव या बैठकीत १९ विरुद्ध ३ मतांनी संमत झाला. रशिया, चीन व बुर्किना फासो या देशांनी या ठरावाला विरोध केला. इराणचे ड्रोन रशिया युक्रेन विरुद्धच्या युद्धात वापरत आहे. रशियाचा चीन हा मित्र आहे. इराण, रशिया चीनमध्ये अघोषित हुकुमशाही आहे. युरेनियम समृद्ध करण्याचा नवा प्रकल्प सुरक्षित ठिकाणी उभारण्याचे या ठरावानंतर इराणने जाहीर केले होते. त्यानंतर इस्रायलने हा हल्ला केला. गेल्या वर्षीही ऑक्टोबरमध्ये इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केले होते. इराणमध्ये खोलवर अचूक मारा करण्याची क्षमता इस्रायलने वेळोवेळी सिद्ध केली आहे. या दोन देशांतील संघर्षास धार्मिक पार्श्वभूमीही आहे. इराणने अणुबॉम्ब बनवल्यास आपल्या अस्तित्वास धोका निर्माण होण्याची भीती इस्रायलला आहे. या भागातील इस्लामी देशांनी इराणला उघड पाठिंबा दिलेला नसला तरी त्यांनी इस्रायलचा निषेध केला आहे. या भागातून जगास खनिज तेलाचा पुरवठा होतो. त्यात भारतही आहे. दोन्ही देशांशी भारताचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे भारताने दोघांना शांततेचे आवाहन केले आहे; मात्र आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत इस्रायल युद्ध थांबवेल, अशी चिन्हे दिसत नाहीत.

Related Articles