गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी   

भावार्थ रामायणातील कथा, विलास सूर्यकांत अत्रे 

जनक हा मिथिला नगरीचा राजा. सीता ही त्याची कन्या. जनकाची कन्या म्हणून तिला जानकी हे नावही पडले. जनक राजाने सीतेचे स्वयंवर ठरविले होते. विश्वामित्रांकडे यज्ञ याग सफल झाल्याची माहिती जनकाला होती. या यज्ञासाठी विश्वामित्रांकडे अनेक ऋषी, मुनी, वैदिक, संत सज्जन आले असल्याची माहिती जनकाला होती. रामाने केलेल्या पराक्रमाची माहिती ही त्याला समजली होती. त्या सर्व ऋषी, मुनींचे आशीर्वाद जानकीला मिळावे असे जनकाला वाटले. रामाबद्दल कुतुहलही त्याच्या मनात होते. म्हणून यज्ञासाठी आलेल्या सगळ्यांना घेऊन सीतेच्या स्वयंवराला या सगळ्यांनी यावे, असे जनकाला वाटत होते. आपल्या दोन सेवकांना जनकाने निमंत्रण देण्यासाठी पाठविले होते.   
 
यज्ञ संपन्न झाला, या आनंदात ऋषीमुनी विश्वामित्रांच्या आश्रमात विश्राम करत असतानाच, जनकाचे सेवक स्वयंवराचे निमंत्रण देण्यासाठी आले. त्या सेवकांनी जनकाने सांगितल्याप्रमाणे आग्रहाचे निमंत्रण दिले. विश्वामित्रांना विनंती केली, की त्यांनी यज्ञासाठी आलेल्या ऋषीमुनींना, ब्राह्मणांना तसेच राम-लक्ष्मण या सगळ्यांना घेऊन मिथिलेला यावे. जनकाचे निमंत्रण मिळाल्यानंतर ऋषीमुनींना आपल्याबरोबर स्वयंवराला येण्याची विश्वामित्रांनी विनंती केली. विश्वामित्रांसारख्या ऋषिवराची विनंती कुणालाच नाकारण्याचे कारण नव्हते. उलट तो त्यांना आपला बहुमान वाटला.
 
ऋषीमुनी मिथिलेला जाण्यास तयार झाले. या स्वयंवराला राम लक्ष्मण यांनीही आपल्या बरोबर मिथिलेला यावे असे विश्वामित्रांला वाटले. विश्वामित्रांनी तसे राम-लक्ष्मण यांना विचारले, विश्वामित्रांची विनंती ही गुरूआज्ञा समजून राम आणि लक्ष्मण त्यांच्या बरोबर जाण्यास तयार झाले. विश्वामित्रांबरोबर मिथिलेला जाण्याचे सगळ्यांनीच ठरविले. जनकाने या स्वयंवराचे निमंत्रण सर्व राजे, राजवाडे, थोर ऋषिमुनी, साधुसंत, प्रतिष्ठित प्रजाजन या सगळ्यांना पाठविले होते. विश्वामित्रांबरोबर रामाला वनात पाठविल्यामुळे दशरथ स्वैरभैर झाला होता. रामाच्या विरहाने तो व्याकूळ झाला होता. रामाशिवाय सगळे जग त्याला शून्य वाटत होते. त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. त्याला कशाचेही भान नव्हते. त्यामुळे जनकाने पाठविलेले निमंत्रण अयोध्येला मिळूनही ते दशरथाच्या जाणिवांपर्यंत पाहोेचले नव्हते.
 
विश्वामित्र, ऋषीमुनी, राम-लक्ष्मण सगळेच मिथिला नगरीकडे निघाले. वाटेवर एका उपवनातून मार्गक्रमण करीत असताना, त्या उपवनाच्या एका कोपर्‍यात एक ओसाड आश्रम त्यांच्या नजरेस पडला. आश्रमाची रया पूर्णपणे गेलेली होती. छप्पर मोडकळीस आलेले होते. दारे उघडी होती, भिंतीचे पोपडे उडलेले होते. त्या आश्रमाचा परिसर उजाड झाला होता. झाडे ओकिबोकी दिसत होती. तिथे पशु-पक्षी दिसत नव्हते. निसर्गाने तेवढाच परिसर वाळीत टाकल्यासारखा निर्जीव दिसत होता. रामाने तो आश्रम, त्याच्या भोवतीचा परिसर पाहिला. रामाला ते पाहून कुतुहल वाटले. त्याने विश्वामित्रांना विचारले, ‘मुनिवर इथे कधीकाळी चांगला नांदता, जागता कुणा ऋषींचा आश्रम असेल असे वाटते; पण आज या आश्रमाची अगदी विपिन्न अवस्था झालेली दिसत आहे. या आश्रमाला कुणा ऋषीमुनिंचा शाप बाधला का? हा आश्रम आहे तरी कुणाचा? याची अशी दुर्दशा का झाली? त्याला काय कारण घडले? म्हणून विश्वामित्रांना विचारले.
 
विश्वामित्र रामाला म्हणाले, ‘रामा तू म्हणतोस ते खरे आहे. हा आश्रम गौतम ऋषींचा होता. ते आणि त्याची पत्नी अहल्या हे दोघे आपल्या शिष्यांसह या आश्रमात रहात होते. इंद्राने अहल्येला फसविले. त्यामुळे गौतमाने अहल्या आणि इंद्राला शाप दिले. त्या शापांमुळे या आश्रमाला ही दैन्यावस्था प्राप्त झालेली आहे’. ते ऐकून रामाचे कुतुहल अजून वाढले. तो विश्वामित्रांना म्हणाला, ’हे ऋषीश्रेष्ठा ही अहल्या कोण? इंद्राने तिला कसे आणि का फसविले? गौतमाने काय शाप दिले? ती संपूर्ण कहाणी कृपया सांगावी’. रामाच्या विनंतीवरून विश्वामित्र बोलते झाले. 
 
’अहल्या ही ब्रह्मदेवाची मुलगी. ती अतिशय सुंदर, देखणी, लाघवी, गोड असावी असे ब्रह्मदेवाला तिची निर्मिती करताना वाटले होतेे. तिची निर्मिती करताना, त्रैलोक्यात स्त्री म्हणून स्त्रीचे असलेले जे काही सौंदर्य आहे, ते सर्व सौंदर्य ओतून आपल्या कन्येला ब्रह्मदेवाने निर्माण केले. ती ब्रह्मदेवाची कन्या, त्यानेच निर्मिती केलेली. तिच्या रंग रूपाचे काय वर्णन करणार? ब्रह्मदेवाने तिचे नाव अहल्या असे ठेवले होते. ती इतकी नाजूक होती, की तिला चंद्रकिरण खुपावेत. तिचा स्पर्श रेशमापेक्षा मऊ मुलायम होता. तिचा आवाज अमृताहून गोड होता. जगात रतीहून सुंदर, नाजूक म्हणून नागस्त्रीया या प्रसिद्ध आहेत. अशा नागस्त्रीयाही अहल्येच्या पुढे राकट वाटाव्या, इतकी ती सुंदर होती, नाजूक होती. तिच्यावर कुणाचीही दृष्टी पडली, की तिथून ती हलतच नसे, इतकी ती आकर्षक होती. अशी ही अहल्या वयात आली आणि तिच्यासाठी योग्य वर कोण असेल आणि तो कसा मिळेल याचा घोर ब्रह्मदेवाला लागून राहिला’. 
 
’तिच्या प्राप्तीसाठी देवादिदेवात स्पर्धा लागली होती. प्रत्येकाला वाटत होते की, अहल्या ही आपलीच व्हावी. तिच्या योग्यतेचा वर मिळावा म्हणून ब्रह्मदेवाने तिच्या विवाहाचा पण लावला. तो पणही असा तसा नव्हता. अतिशय कठीण असा तो पण होता. ब्रह्मदेवाचा पण होता, ’दोन प्रहरात जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करेल, त्याच्या हातात अहल्येचे हात देईन’. ब्रह्मदेवाने लावलेला पण ऐकून सगळेच देवादिक यांची धांदल उडाली. प्रत्येकाला अहल्येचा मोह पडला होता; पण त्यासाठी दोन प्रहरात पृथ्वी प्रदक्षिणा करायची होती. अहल्येच्या प्राप्तीसाठी तर सगळे वेडावले होते. इंद्र ऐरावतावर बसून, चंद्र हरणावर बसून, मेंढ्यावर बसून अग्नी, तर टोणग्यावर बसून यम असे जो तो आपापली वाहने सरसावून निघाले. तेच नाही तर इतर देव तसेच ऋषीमुनीही अहल्येच्या प्राप्तीसाठी कामातूर झाले होतेे; पण जिंकण्यासाठी उतावीळ होऊन जो तो आपापला मार्ग शोधू लागला’. 
 
गायीचा प्रसव काळ सुरू असताना त्या गाय-वासराचे मुख दर्शन घेऊन गायीला तीन प्रदक्षिणा घातल्यास ती पृथ्वी प्रदक्षिणा होते, याचे ज्ञान गौतमाला होते. गौतमाने त्यासाठी अनुष्ठान केले. गौतमाला अनुष्ठानाचे फळ तात्काळ मिळाले. प्रसव अवस्थेतील गाय गौतमाला सामोरी आली. गौतमाने तिला तीन प्रदक्षिणा घातल्या आणि ब्रह्मदेवाचा पण पूर्ण केला. शास्त्राप्रमाणे पणाची पूर्तता झालेली होती. गौतमाची विद्वता, ज्ञान, तप या सगळ्याची ब्रह्मदेवाला खात्री पटली. पणाचीही पूर्तता झालेली असल्यामुळे ब्रह्मदेवाने अहल्याचा हात गौतमाच्या हातात दिला. अहल्या आता गौतमाची पत्नी झाली होती.
 
पहिला प्रहर सरता सरता इंद्र ब्रह्मदेवापुढे आला. त्याचा उत्साह वाहून चालला होता; पण आपणच जिंकलो आहे, अहल्या आता आपलीच होणार अशी त्याची मनोमन खात्री झालेली होती; पण त्याआधीच अहल्येने गौतमाला वरले होते. अहल्या गौतमाची झालेली होती. आता इंद्राला कायमची अहल्या अप्राप्य झाली होती. इंद्राला सगळा वृतांत समजला. ब्रह्मदेवाने अहल्येचा हात गौतमाच्या हातात दिल्याचे समजले. त्याचा संताप संताप झाला. अहल्या आपली व्हायला हवी. त्यासाठी काहीही करण्याची त्याच्या मनाची स्थिती झाली. इंद्राच्या मनातील अभिलाशा ब्रह्मदेवाला समजून आली. त्यामुळे अहल्येला इंद्रापासून धोका आहे, हे ब्रह्मदेवाने जाणले होते. अहल्येला इंद्रापासून धोका आहे म्हणून इंद्रापासून सावध रहा, अशी सूचना ब्रह्मदेवाने गौतमास दिलेली होती. गौतम आणि अहल्या या आश्रमातच सुखाने संसार करू लागले होते. ब्रह्मदेवाने दिलेल्या सुचनेप्रमाणे गौतमाने इंद्रापासून जरूर ती सावधगिरी बाळगली होती. गौतम आणि अहल्या हे दोघेही आपापली नित्यनैमित्यीक कर्मे आचरत होती. सर्व काही सुरळीत चालले होते.
 
(आधार संत एकनाथकृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय १४)

Related Articles