कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...   

अहमदाबाद : अहमदाबादच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे आर्यन राजपूत, जयप्रकाश चौधरी आणि मानव भादू हे तीन मित्र उपहारगृहात जेवणासाठी एकत्र बसले होते. त्याचवेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. विमान दुर्घटनेवेळी ढिगार्‍याखाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना कल्पनाही नव्हती की हे त्यांचे शेवटचे एकत्र जेवण असेल.
 
आर्यन राजपूत हा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळील जिगसोली गावचा रहिवासी होता. गेल्या वर्षी नीट परीक्षेत ६९५ गुण मिळवल्यानंतर त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. मानव भादू हा राजस्तानातील हनुमानगड येथील असून तो प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. तर जय प्रकाश चौधरी हा राजस्तानातील बोरीचरण गावचा रहिवासी होता आणि दुसर्‍या वर्षात शिकत होता. तिघांनीही ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश घेतला होता. ते चांगले मित्र होते. 
 
त्यांचे वसतिगृह उपहारगृहापासून ५०० मीटर अंतरावर होते. अपघाताच्या वेळी तिघेही जेवण करत असताना विमान थेट उपहारगृहाच्या इमारतीवर आदळले. काही विद्यार्थी ढिगार्‍याखाली गाडले गेले, तर काही जण कसेबसे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. दरम्यान, राकेश दिओरा या आणखी एका विद्यार्थ्याचा यात बळी गेला. तो भावनगरमधील दिओरा गावचा रहिवासी होता. वैद्यकीय पदवीच्या दुसर्‍या वर्षात तो शिकत होता. राकेश त्या तिन्ही मित्रांच्या टेबलाशेजारी बसला होता.
 
राकेश दिओरा बुधवारपर्यंत अहमदाबाद येथील त्याच्या नातेवाईकाच्या निवासस्थानी होता. त्याने कोणतेही अभ्यास साहित्य सोबत आणले नव्हते. त्याची पुस्तके वसतिगृहात असल्याने आणि परीक्षा १६ जून रोजी सुरू होणार असल्याने तो बुधवारी घरातून निघून गेला.मला विमान अपघाताची माहिती मिळताच मी त्यांना फोन करायला सुरुवात केली, पण माझ्या फोनला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नंतर त्याच्या मृत्यूची बातमी समजली, असे त्याच्या नातेवाईकाने सांगितले. 

Related Articles