जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे   

जयपूर : राजस्तानच्या बाडमेरमधील धर्माराम चौधरी या गरीब शेतकर्‍याने कर्ज काढून मुलगा जयप्रकाश याला नीटची तयारी करण्यासाठी कोटा येथे पाठवले. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या जयप्रकाशनेही खूप मेहनत घेतली आणि नीट परीक्षेत यशस्वी झाला. जयप्रकाशला अहमदाबादच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला; पण विमान अपघाताने जयप्रकाशची आणि त्याच्या कुटुंबाची स्वप्ने भंगली.
 
धर्माराम चौधरी हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतीसोबतच ते बालोतरा येथील एका कारखान्यात मजुरीचे कामही करतात. मुलगा जयप्रकाश याने डॉक्टर बनण्याची इच्छा व्यक्त केली. मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धर्माराम यांनी कर्ज काढण्याचा निर्णय घेतला. कर्ज घेऊन त्यांनी जयप्रकाशला कोटा येथे नीटच्या तयारीसाठी पाठवले. त्यानेही दोन वर्ष मेहनत घेतली आणि २०२३ मध्ये तो नीट परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला ६७५ गुण मिळाले. अहमदाबादच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. काही वर्षातच त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.गुरूवारी अहमदाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर एअर इंडियाचे विमान कोसळले. त्यावेळी वसतिगृहाच्या उपहारगृहात जेवण करणार्‍या प्रशिक्षणार्थी डॉक्टरसह विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला. यात जयप्रकाशचाही समावेश होता.
 
दुर्घटनेच्या अर्ध्या तासापूर्वी वडिलांशी संवाद 
   
गुरुवारी दुपारी १ वाजता जयप्रकाशने आपल्या वडिलांना फोन केला होता. आता अभ्यासिकेतून वसतिगृहाच्या उपहारगृहात जेवण करण्यासाठी जात आहे.    मोबाईलची बॅटरी संपली आहे. त्यामुळे संध्याकाळी पुन्हा फोन करेन, असे त्याने वडिलांना सांगितले होते. यानंतर अर्ध्या तासातच ही विमान दुर्घटना घडली. २० वर्षांचा जयप्रकाश ४० टक्के भाजला होता. इमारतीचा ढिगारा त्याच्या अंगावर पडला होता. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जयप्रकाशच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.

Related Articles