वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त   

निगडी ते पिंपरी सेवा रस्त्याची दुरवस्था

पिंपरी : महामेट्रो, अर्बन स्ट्रीट आणि जलवाहिनीच्या कामासाठी केलेल्या रस्तेखोदाईमुळे निगडी ते पिंपरी या सेवा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहतूक नियंत्रण दिव्यांचा कालावधी अधिक असल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निगडी ते पिंपरी मार्गावर महामेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोचे खांब उभारण्यासाठी खोदाई केली आहे. यासाठी सुरक्षा कठडे उभारले असून, त्याच्या आत हे काम सुरू असते. 
 
या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. बीआरटी मार्गामध्ये जलवाहिनीची खोदाई सुरू आहे. त्यामुळे पीएमपी बससुद्धा सेवा रस्त्यावरूनच धावत आहेत. 
सेवा रस्त्याची रुंदी कमी झाल्याने यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठीच कसरत करावी लागत आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, मोरवाडी या सर्व महत्त्वाच्या चौकांतील सिग्नलचा कालावधी अधिक असल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागत आहेत. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी अर्धा किलोमीटर अंतरासाठी चालकांना वीस मिनिटे लागत आहेत.
 
चेंबरच्या कामामुळे कोंडी
 
सेवा रस्त्यावर बजाज ऑटो, आकुर्डी शुक्रवारी एक चेंबर खचल्याचे मेट्रो प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे हे चेंबर तत्काळ बदलण्यासाठी निगडीकडून पिंपरीच्या दिशेने येणारी वाहतूक थांबविण्यात आली. या कामासाठी अर्धा तासाचा कालावधी लागला. तोपर्यंत मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 
 
पालखी मार्गावर खड्डे
 
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून १८ जून रोजी प्रस्थान होणार असून, १९ जून रोजी ती आकुर्डीत मुक्कामी असणार आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात पालखी सोहळ्याचे पालिकेच्या वतीने स्वागत केले जाते. मात्र, या चौकात मेट्रो मार्गासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू आहे. पिंपरीपर्यंत मेट्रो, अर्बन स्ट्रीट, जलवाहिनीसाठी रस्तेखोदाई सुरू आहे. खड्डे पडले आहेत. पालखी सोहळा पाच दिवसांवर आला असताना मार्गावरील हे खड्डे कायम आहेत.

Related Articles