शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी सरपंच व ग्रामपंचायतीने लक्ष घालावे : उपमुख्यमंत्री पवार   

पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी सरपंच व ग्रामपंचायतीने लक्ष घातले पाहिजे.शैक्षणिक मेळावे, वेळोवेळी शाळेचा आढावा, शाळेला मदत करण्याची भूमिका घेतली तरच पुणे मॉडेल स्कूलची ही शिक्षण चळवळ यशस्वी होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे जिल्हा परिषदेनी सुरू केलेली पुणे मॉडेल स्कूल व मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यभरात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
पुणे जिल्हा परिषदेच्या पुणे मॉडेल स्कूल व मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी शिक्षणमंत्री दादा भुसे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम  गोर्‍हे, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, आमदार बापूसाहेब पठारे, सुनील शेळके, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांसह जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रंसगी आदर्श शाळा व शिक्षकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 
 
पवार पुढे म्हणाले, जिल्हा परिषदांच्या शाळांतून चांगले शिक्षण मिळत असून, त्यात सातत्य टिकले पाहिजे. राज्याचे एकूण अंदाजपत्रक ७ लाख २० हजार कोटींचे आहे. त्यातील १ लाख कोटी रुपये केवळ शिक्षणावर खर्च करण्यात येतात. आम्ही शिक्षणावर एवढा निधी देऊन उपकार करत नाही. मात्र, त्याप्रमाणेच दर्जेदार शिक्षणही विद्यार्थ्यांना मिळणे तितकेच गरजेचे आहे. ही केवळ शिक्षकांची जबाबदारी नाही तर सर्वांची आहे. माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सर्वांच्या सहयोगातून ग्राम स्वच्छता अभियान यशस्वी करून दाखवले.  त्याची दखल केंद्र स्तरावर घेण्यात आली. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी लोकचळवळ झाली पाहिजे. त्यासाठी गावातील सरपंच, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, सीएसआरचा निधी, शिक्षण विभाग व अधिकारी या सर्वांनी एकत्रित येत अत्याधुनिकतेची जोड देत ही शिक्षण चळवळ पुढे नेली पाहिजे. 
 
जिल्हा परिषदेतील शिक्षकांकडून उत्तम शिक्षण दिले जात आहे. या उलट पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना लिहिता व वाचता येत नाही, असे विरोधाभासाचे चित्र आहे. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून शिक्षणमंत्री दादा भुसे शिष्यवृत्तीची संख्य वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आदर्श शिक्षकांची बँक तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सहली आता शेतात, बँक, गड-किल्ले, दवाखाना आदि ठिकाणी काढण्यात येणार आहेत. सांस्कृतिक नाळ न तुटता आनंददायी शिक्षण देण्याचा शासनाकडून प्रयत्न आहे. यावेळी डॉ. नीलम गोर्‍हे यांचेही भाषण झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रास्ताविक तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आभार मानले. गणेश कला क्रीडा मंच येथील सभागृह शिक्षकांनी भरून गेले होते.

Related Articles