शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक   

पुणे : शिक्षण संस्थांनी केवळ माहिती देणार्‍या संस्था न राहता समाजात परिवर्तन घडवणार्‍या संस्था बनणे आवश्यक आहे. लोकमान्य टिळकांनी शिक्षणाकडे राष्ट्रीय स्वाभिमान व सामूहिक सक्षमीकरणाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून पाहिले. स्वराज्याची आकांक्षा ही शिक्षित राष्ट्रच बाळगू शकते, असे स्पष्ट मत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी व्यक्त केले.
 
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि सेंटर ऑफ ट्रेनिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानाचे समन्वय : जागतिक प्रगतीमध्ये शैक्षणिक संस्थांची भूमिका’ या विषयावर दोन दिवसाचे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दृकश्राव्य प्रणालीद्वारे करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. टिळक बोलत होत्या. उद्घाटन समारंभ टिमविच्या मुकुंदनगर येथील गौरीताई टिळक सभागृहात पार पडला.
 
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बँक ऑफ बडोदा, मुंबई येथील कॉर्पोरेट कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक शैलेन्द्र सिंग हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी टिमविच्या प्रभारी कुलसचिव सुवर्णा साठे, अधिष्ठाता डॉ. उज्ज्वला बर्वे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अंबर बेहरे आणि डॉ. उमा सिंग यांनी केले.  समारोप सत्रात मुख्य पाहुणे म्हणून मोनॅश बिझनेस स्कूल (मेलबर्न, ऑस्ट्रेलिया) येथील मार्केटिंग विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधा मणी आणि दिल्ली विद्यापीठाच्या कंटिन्युअस एज्युकेशन अँड एक्स्टेन्शन विभागप्रमुख प्रा. कुमार आशुतोष यांची उपस्थिती होते.
 
डॉ. गीताली टिळक म्हणाल्या, लोकमान्य टिळकांचे शिक्षणाबाबतचे विचार मूलगामी, दूरदृष्टीचे आणि आजही तितकेच प्रासंगिक आहेत. त्यांच्या मते, शिक्षण संस्था केवळ सैद्धांतिक शिक्षण देणारी ठिकाणे नव्हती, तर ती चारित्र्यनिर्मिती, टीकात्मक विचार व नागरी धैर्य घडवणारी मंदिरे होती. आजच्या तंत्रज्ञानप्रधान व झपाट्याने बदलणार्‍या जगातही लोकमान्यांचे विचार मार्गदर्शक ठरतात, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.या परिषदेमागील उद्देश ज्ञानाचे विविध क्षेत्रांत व संस्कृतींमधील समन्वय साधणे हा असल्याचे सांगत डॉ. टिळक पुढे म्हणाल्या, विद्यापीठ लोकमान्य टिळक यांच्या आदर्शांवर आधारित ज्ञानदानाचे कार्य करत आहे. येथे अशा विद्यार्थ्यांना घडवले जाते जे जागतिक स्तरावर सक्षम असूनही भारतीय मूल्यांशी जोडलेले असतात. ज्ञानाद्वारे सक्षमीकरण, चारित्र्यद्वारे राष्ट्रनिर्माण आणि संवादाद्वारे जागतिक समन्वय हे तीन आधारस्तंभ आमच्या शिक्षणपद्धतीचे केंद्रबिंदू आहेत.
 
समारोप प्रसंगी डॉ. कुमार आशुतोष म्हणाले, शिक्षण हे मानवनिर्मित असून आपले जीवन ते टिकवून ठेवते. शिक्षण हे निरंतर असून आपण कायम विद्यार्थी म्हणून शिकत राहिले पाहिजे. दिल्ली विद्यापीठ, ग्राउंड्स कमिशन आणि विविध चेंबर ऑफ कामर्स यांच्या सहकार्याने अनेक शैक्षणिक प्रकल्पांवर काम केले आहे. आतापर्यंत २० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.प्रा. सुधा मणी यांनी ऑस्ट्रेलिया अ‍ॅकेडमियाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी समाजावर समाज माध्यमांचा प्रभाव कसा पडतो, हे विविध उदाहरणांसह स्पष्ट केले. परिषदेमध्ये विविध विभागांतील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles